खडकपूर्णा धरणात रेती उपसा करणाऱ्या ४ बोटी स्फोट करून उडवल्या! महसूल विभागाची कारवाई...बोटीवरील मजुरांनी पाण्यात उड्या मारल्या, पोहत पोहत पळून गेले...

 
 देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरण क्षेत्रात सुरु असलेल्या रेतीच्या अवैध उपशावर महसूल विभागाने मोठी कारवाई करत चार बोटी नष्ट केल्या. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
 
मंगळवारी दुपारी देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणाराजा शिवारातील खडकपूर्णा जलाशयाजवळ रेती उपसा प्रतिबंधक विशेष पथकाने छापा टाकला. यावेळी चार बोटी जलाशयातून रेती उपसून काठावर आणताना आढळून आल्या. या बोटींवर १० ते १२ मजूर कार्यरत होते. पथक आल्याचे लक्षात येताच त्यांनी बोटी पळविण्याचा प्रयत्न केला, मात्र महसूल कर्मचाऱ्यांनी पाण्यात उतरून बोटी ताब्यात घेतल्या.
पथकाने बोटीवरील मजुरांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पाण्यात उडी घेऊन पलायन करण्यात यशस्वी झाले. या चारही बोटी पाण्यातून बाहेर काढणे अशक्य असल्यामुळे जिलेटिनच्या साहाय्याने त्या जागेवरच नष्ट करण्यात आल्या. या ठोस कारवाईमुळे रेतीचा अवैध उपसा करणाऱ्यांना थेट इशारा देण्यात आला आहे.
येत्या काळात महसूल विभाग या परिसरात कारवाईची आणखी व्याप्ती वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. पाटील व उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडल अधिकारी रामदास मोटे, ग्राम महसूल अधिकारी कृष्णा खरात, सुमित जाधव, संजय बरांडे, सरिता वाघ, तांबे, श्रीमती रगडे, तसेच शिपाई ताठे, महसूल सेवक खंदारे, सचिन पुरी, विठ्ठल हरणे, मारुती बंगाळे, कविता खरात, सचिन बंगाळे, पवन देढे, वैशाली देशमाने यांच्या पथकाने केली. यावेळी खडकपूर्णा प्रकल्पाचे अधिकारी स्मित येसनसुरे, त्यांचे कर्मचारी, तसेच पोलिस कॉन्स्टेबल चव्हाण आणि वायाळ हेही उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे, स्थानिक पातळीवरील काही महसूल कर्मचाऱ्यांकडून रेती तस्करांना माहिती दिली जात असल्याचे आरोप होत असून, त्यामुळे कारवाईस अडथळा निर्माण होत आहे.