बुलडाणा जिल्ह्यात चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; सिताराम मेहेत्रे झाले बोराखेडी पोलीस ठाण्याचे नवीन प्रमुख....

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदल्यांतर्गत चार पोलीस निरीक्षकांची नवीन ठिकाणी बदली करण्यात आली असून, बोरखेडी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी सिताराम मेहेत्रे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज, २२ जून रोजी पदभार स्वीकारला.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार २१ जून रोजी जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले. बदल्यांमध्ये बोरखेडीसह नांदुरा, खामगाव ग्रामीण आणि मलकापूर ग्रामीण या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
या बदल्यानुसार, नांदुरा पोलीस ठाण्याचे नवीन ठाणेदार म्हणून जयवंत सातव यांची, तर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याची जबाबदारी किशोर तावडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याशिवाय, मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे नवीन ठाणेदार म्हणून सतीश महल्ले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, बोरखेडी पोलीस ठाण्याचे माजी ठाणेदार सारंग नवलकर यांची बदली नंदुरबार येथे झाल्यानंतर हे पद काही दिवसांपासून रिक्त होते. आता त्या ठिकाणी सिताराम मेहेत्रे यांनी नवीन ठाणेदार म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. या बदल्यांमुळे संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.