माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यात अचानक आग; फ्रिज फुटल्याने किचन जळाले
Jun 18, 2025, 20:32 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बुलडाणा शहरातील बंगल्यात आज सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. सहकार विद्या मंदिराजवळ असलेल्या त्यांच्या निवासस्थानी ही आग लागली.
प्राप्त माहितीनुसार, सायंकाळी सातच्या सुमारास घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या किचनमधील फ्रिज अचानक फुटल्याने आग लागली. त्यामुळे किचनमध्ये ठेवलेले काही साहित्य व पीओपीचे काम जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येताच बुलडाणा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागलेल्या वेळी डॉ. शिंगणे व त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते. घरात केवळ वॉचमन उपस्थित होता. या आगीत मोठ्या अनर्थ टळल्याची चर्चा शहरात होत आहे.