देऊळघाटजवळ फर्निचर दुकानावर वन विभागाची धाड; १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यात अवैध सागवान तस्करीविरोधात वन विभागाने कडक भूमिका घेतली असून, देऊळघाट परिसरातील फर्निचर दुकानावर टाकलेल्या धाडीमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत. देऊळघाट येथील बिरसिंहपूर रोडवर असलेल्या एका फर्निचर दुकानाजवळून विनापरवाना साठवलेले सागवान लाकूड व यंत्रसामग्री असा सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहे.

बुलढाणा वन विभागाच्या वनसंरक्षक (डीएफओ) सरोज गवस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, देऊळघाट परिसरात रमेश नाना बोराळे (वय ६२) यांनी अवैधरित्या सागवान लाकडाची साठवणूक करून त्यापासून फर्निचर तयार करून विक्री केल्याचा संशय होता. या माहितीनंतर आरएफओ सुनील वाकोडे यांनी तात्काळ पथक रवाना केले.
पथकाने घटनास्थळी छापा टाकत रंधा मशीन, गोल सागवान लाकडे, चौरस सागवान लाकडे असा मोठा साठा जप्त केला. प्राथमिक चौकशीत सदर लाकूड विनापरवाना कापलेले व साठवलेले असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी संबंधित फर्निचर दुकान मालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रदीप मुंढे, वनरक्षक कु. एस. बी. कराड, वनरक्षक समाधान झोटे, तसेच चालक संदीप मडावी, प्रवीण सोनवणे, पवन वाघ, दीपक सोनवणे, रवींद्र तायडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
या धाडीमुळे देऊळघाटसह परिसरातील अवैध सागवान तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा इशाराही वन विभागाकडून देण्यात आला आहे.