बुलढाण्यात चारा विक्रीला ‘ब्रेक’! जिल्ह्याबाहेर कडबा, कुट्टी नेण्यासही बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा कडक आदेश

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पशुधनासाठी उपलब्ध चारा सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतून हिरवा चारा, कडबा, विविध प्रकारची कुट्टी तसेच पशुखाद्य इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर वाहतूक करून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये याबाबत आदेश जारी केला आहे.


महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात उपलब्ध असलेला चारा मोठ्या प्रमाणावर बाहेरील जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर विक्रीसाठी पाठविला गेल्यास भविष्यात जिल्ह्यातच गंभीर चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्बंध लागू केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर हिरवा चारा, कडबा, विविध प्रकारची कुट्टी आणि पशुखाद्य वाहतूक करून विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारा व्यापारी, उत्पादक तसेच संबंधित वाहतूकदारांना या आदेशाची विशेष दखल घ्यावी लागणार आहे.

सरकारी मंजुरीला अपवाद

मात्र, शासकीय यंत्रणेमार्फत केली जाणारी चारा वाहतूक किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेली चारा वाहतूक या आदेशाच्या कक्षेत येणार नाही. म्हणजेच प्रशासनाच्या परवानगीने करण्यात येणाऱ्या अधिकृत चारा वाहतुकीला ही बंदी लागू होणार नाही.

आदेश मोडल्यास कारवाईचा इशारा

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेर चारा पाठविण्यापूर्वी संबंधितांनी प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे.
३० सप्टेंबर २०२६ पासून हा आदेश लागू झाला असून, पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत तो लागू राहणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा आणि भविष्यातील संभाव्य टंचाई टाळता यावी, या उद्देशाने प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.