खडकपूर्णात पुन्हा ५ बोटी उडवल्या! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त कारवाई..

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खडकपूर्णा जलाशयातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू आहे. काही दिवसाआधी महसूल आणि पोलीस प्रशासनाने रेती उपचार करणाऱ्या बोटी उडवल्या होत्या. मात्र रेतीमाफिया एवढे मस्तवाल झाले आहेत की त्यांनी लगेच दुसऱ्या बोटी धरणात उतरून रेती उपसा सुरू केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महसूल आणि पोलीस प्रशासनाला दिले होते. त्यानुसार काल रात्री, महसूल आणि पोलीस प्रशासन, परिवहन विभाग आणि खडकपूर्णा प्रकल्प विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवत ५ बोटी उध्वस्त केल्या आहेत.
  काल दिवसभर शोध मोहीम सुरू होती. काही बोटी मराठवाडा शिवारात जाफराबाद कडे पळून गेल्या. शेवटी चिंचखेड शिवारात अवैध रेती उपसा करणाऱ्या ३ फायबर बोटी व दोन इंजिन बोटी अशा एकूण पाच बोटी पकडण्यात आल्या. 
ही कारवाई उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनात देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार संतोष मुंडे, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, प्रल्हाद केदार, विलास नागरे, परमेश्वर बुरकुल, सागर देशपांडे, सुमित जाधव ,संजय बरांडे, तेजस शेटे महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल शिंदे व पोलिस पथक, परिवहन विभागाचे अधिकारी परिवहन निरीक्षक प्रतिक रोडे , शोध व बचाव पथकाचे श्री पवार यांच्या पथकाने केली. रात्री ११ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.