देऊळगावमहीत अग्नीतांडव! दुकानांना आग; ३५ ते ४० लाखांचे नुकसान...
Mar 24, 2025, 09:02 IST
देऊळगावराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देऊळगाव मही येथील राष्ट्रीय चिखली-जालना रोडवरील चार दुकानांना शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत चार ते पाच दुकान जळून खाक झाले आहे. यामध्ये दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
श्री शिवाजी विद्यालयासमोर असलेल्या विजय श्रीराम शिंगणे यांच्या मालकीचे संदीप होलसेल व चिल्लर किराणा दुकान, संजय पहाड यांचे फायबर फर्निचर दुकान, शेख नसीम यांचे सायकल स्टोअर आणि सुनील शिंगणे यांचे दुकान या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण करत या चारही दुकानांना आपल्या कवेत घेतले. किराणा माल, फर्निचर, सायकल, टायर-ट्यूब, दरवाजे, गोळ्या-बिस्कीट, पाणी बॉटल आणि इतर साहित्य जळाले. प्राथमिक पंचनाम्यानुसार या आगीमुळे सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.