कव्हळा गावात अग्नितांडव! कृषी सेवा केंद्र जळून खाक...

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) जिल्ह्यातील कव्हळा गावात काल रात्री भीषण आग लागल्याने मोठा अनर्थ घडला. मारोती मंदिर परिसरात अचानक लागलेल्या आगीत न्यू क्रांती कृषी सेवा केंद्र पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आगीच्या विळख्यात जवळील घरे आणि कारसुद्धा जळून खाक झाली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या काही खोल्यांपर्यंतही आग पोहोचल्याने त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.....
बुलडाणा जिल्ह्यातील कव्हळा गावात काल रात्री भीषण आग लागली आग आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण गावातील लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले. गावकऱ्यांनी तब्बल तीन तास प्रयत्न करून अखेर आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे आणखी नुकसान टळले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. विशेष म्हणजे, शेतकरी रामदास महाले, रतन आढाव यांनी नुकतेच काडून आणलेले सोयाबीन आणि साठवलेले गहू या आगीत जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, पुढील पीक हंगामासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या या नुकसानीबद्दल गावकऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहे.गावकऱ्यांनी आता प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे. न्यू क्रांती कृषी सेवा केंद्राचे मालक, ग्रामपंचायत, आणि इतर प्रभावित कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन गावाला आवश्यक मदत पुरवावी, अशी विनंती गावकऱ्यांकडून केली जात आहे.