अग्नितांडव! हनवतखेड गावात दोन घरे आगीत जळून खाक; संसार उघड्यावर; ॲड.जयश्रीताई मदतीसाठी धावल्या...

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील हनवतखेड येथे दोन घरांना भिषण आग लागल्याची दुर्दैवी घटना १३ एप्रिल रोजी घडली होती. लागलेल्या भीषण आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
हनवतखेड येथील राहुल दशरथ चव्हाण हे विट भट्टीवर कामाला असतात. त्यांचे भाऊ दिवंगत भरत चव्हाण यांच्या पत्नी श्रीमती किरण भरत चव्हाण ह्या त्यांच्या शेजारीच राहतात. त्यादेखील मोल मजुरी करुनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात १३ एप्रिल रोजी कुटुंबातील सर्व सदस्य कामासाठी बाहेर गेले होते. याच दिवशी दुपारी घरांना अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी भरत चव्हाण यांची १२ वर्षाची मुलगी कु.वैशाली घरी एकटीच होती. घराला लागलेली आग पाहून शेजारी राहत असलेल्या मैत्रिणीने तिला सावध केले. सुदैवाने कु.वैशालीला कुठलीही इजा झाली नाही. परंतु लागलेल्या भीषण आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. 
 
शिवसेनेच्या प्रवक्ता (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ॲड.जयश्री शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी मा.तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून पिडीतांना मदत देण्यासंदर्भात विनंती केली. तसेच आज ॲड.जयश्री शेळके यांच्या सुचनेनुसार दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून पिडीत कुटुंबियांना कपडे आणि भांडे देऊन मदत करण्यात आली आहे. यावेळी खेडी येथील संजयभाऊ दांडगे, भारतभाऊ निर्मळे, अनिलभाऊ लाजगे, दिशा फेडरेशनच्या जिल्हा समन्वयक स्मिता वराडे, किरण वराडे, मंगेश उबरहंडे, राहुल बाजारे इ.उपस्थ‍ित होते.