अग्नितांडव! दोन कुटुंबाचा संसार उघड्यावर; मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील घटना...
Apr 23, 2025, 08:50 IST
डोणगांव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे भिषण आग लागली. या आगीत दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत घरातील धान्य, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, मोबाइल व अन्य जीवनोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रोजगारसेवक निवृत्ती इंगळे यांच्या राहत्या घरात ही आग लागली. आग इतकी तीव्र होती की काही क्षणांतच शेजारी असलेले त्यांच्या मुलीचे घरही आगीच्या विळख्यात आले. घरांमधील गहू, ज्वारी, डाळी, किराणा, तेलाचे डबे, भांडी, मोबाइल, कानातील श्रवण यंत्र आदी साहित्य पूर्णतः भस्मसात झाले. घटनास्थळी शेख सैयद भाई हे बाहेरून गावात परतले असता, आग त्यांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करत इतर गावकऱ्यांना जागे केले. उन्हाळ्यामुळे अनेक कुटुंब झाडाखाली झोपलेली असल्याने जीवितहानी टळली. आग विझविण्यासाठी गावकऱ्यांनी जीवाचे रान केले. पाण्याची तीव्र टंचाई असतानाही मारुती बोरकर यांनी पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. रोजगार सेवक इंगळे यांच्या नातवाचा शैक्षणिक दस्तावेजांसह रोजगार हमी योजनेचे महत्त्वाचे कागद राखेत बदलले आहेत. गावातील पोलिसपाटील व तंटामुक्ती अध्यक्षांनी पाहणी करून अल्पशी मदत केली आहे. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अरुण आलोने यांनी पंचनामा केला असून, मदतीसाठी अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार आहे. स्थानिक आमदार सिद्धार्थ खरात यांनीही फोनवरून या कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले आहे.