केस व नखगळतीचे मूळ शोधून काढा! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे यंत्रणेला निर्देश; केंद्र आणि राज्य सरकारच्या ९ विभागांची पथके जिल्ह्यात दाखल...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव तालुक्यातील काही गावांमध्ये केसगळतीचा धक्कादादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. केंद्र आणि राज्य सरकारची विविध पथके त्यावेळी जिल्ह्यात आली होती. केसगळतीच्या आजाराचे कारण शरीरातील सेलेनियमचे वाढते प्रमाण असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याबाबतचा अंतिम आणि अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र अशातच केस गळती झालेल्या रुग्णांना आता नखगळती या वेगळ्या आजाराची देखील लागण होऊ लागली आहे. या आजारामुळे खळबळ उडालेली असतानाच या पार्श्वभूमीवर आता केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची विविध पथके तपासासाठी पुन्हा जिल्ह्यात दाखल झाली आहे. या पथक प्रमुखांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बैठक घेत आजाराचे मूळ शोधत प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
 केसगळती आजाराने आता घाटावर देखील पाय पसरायला सुरुवात झाली आहे. चिखली तालुक्यात केसगळतीचे ४ रुग्ण तर मेहकर मध्ये २ रुग्ण आढळले आहेत. आता केसगळती झालेल्या रुग्णांना नखगळती देखील होत असल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत मेहेकर येथे आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ICMR, राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, पाणी गुणवत्ता विभाग जलजीवन मिशन, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथील डरमेट्रोलॉजी विभागाचे वरिष्ठ अध्यापक तज्ञ, अन्नसुरक्षा व मानद प्राधिकरण विभागाचे संचालक आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. ही पथके बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती व नख गळती आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना प्रत्यक्षात भेटून आजाराची मूळ शोधण्याचा प्रयत्न करणार आहे.