अखेर ‘आऊट ऑफ रडार’ तुपकर प्रकटले! मंत्र्यांच्या बंगल्याकडे कूच करताच पोलिसांनी पकडले; गनिमी काव्याने आंदोलनाचा प्रयत्न, कार्यकर्त्यांना वाहनात कोंबले; तुपकरांना आवरताना पोलिसांची दमछाक!
बंदोबस्त चुकवत तुपकरांची ‘एंट्री’; पोलिसांची ऐनवेळी धावपळ!
मंत्रालय परिसर आणि मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांभोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही तुपकरांनी पोलिसांच्या नजरेतून निसटत आंदोलनस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला. ज्या भागात पोलिस बंदोबस्ताची उणीव आहे, तो मार्ग हेरून तुपकरांनी आपल्या समर्थकांसह पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
तुपकर अचानक समोर येताच पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. मंत्र्यांच्या बंगल्याच्या दिशेने तुपकर आणि कार्यकर्त्यांनी कूच करताच पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी तुपकर अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांना आवरताना पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली.
‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है!’
तुपकरांना पोलिसांनी अडवताच आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पोलिसांचा विरोध झुगारून पुढे जाण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून सुरू होता.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत तुपकरांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनांमध्ये बसवण्यात आले. ऐनवेळी झालेल्या या घडामोडींमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळपासून ‘आऊट ऑफ रडार’; अखेर आंदोलनाच्या मैदानात प्रकटले!
तुपकरांच्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून मुंबई पोलिसांनी मंत्रालय परिसर, मंत्र्यांचे बंगले, आमदार निवास आणि मरीन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मरीन ड्राईव्हवर अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले, तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनाही अटक करण्यात आली.
इतका मोठा पोलिस बंदोबस्त असतानाही तुपकर मात्र बराच वेळ पोलिसांच्या रडारवर आले नव्हते. त्यामुळे ‘तुपकर नेमके कुठे आहेत?’ हा प्रश्न चर्चेत असतानाच त्यांनी अचानक एंट्री घेत मंत्र्यांच्या बंगल्याच्या दिशेने कूच केली.
माध्यमांशी बोलताना सरकारवर हल्लाबोल
ताब्यात घेण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना रविकांत तुपकरांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असतानाही सरकारकडून पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
कार्यकर्त्यांची धरपकड, वाहनांची अडवणूक आणि आंदोलन रोखण्यासाठी लावण्यात आलेला प्रचंड पोलिस बंदोबस्त हा सरकारच्या दडपशाहीचा प्रकार असल्याचे सांगत तुपकरांनी त्याचा निषेध केला.
तुपकर सध्या पोलिसांच्या ताब्यात
तुपकर आणि त्यांच्या समर्थकांनी मंत्र्यांच्या बंगल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सध्या रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सकाळपासून ‘आऊट ऑफ रडार’ असलेले तुपकर अखेर पोलिसांच्या हाती लागले असले, तरी पोलिसांचा बंदोबस्त चुकवत त्यांनी केलेली ही गनिमी काव्याची एंट्री आणि त्यानंतर उडालेली पोलिसांची धावपळ मुंबईतील आजच्या आंदोलनाचे सर्वाधिक चर्चेतील दृश्य ठरले आहे.