मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! चिखलीतील स्विमिंग पूल दुर्घटनेवरून राहुल बोंद्रे संतप्त...
Apr 11, 2025, 08:54 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या स्विमिंग पूल मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल,१० एप्रिलच्या सायंकाळी घडली होती. दरम्यान याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अनेक सवाल उपस्थित करीत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तालुका क्रीडा संकुलाच्या स्विमिंग पूल मध्ये डॉ.हेडगेवार वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विवेक अरुण येवले(२३) व सुरज सुनील पानखेडे(२३) या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. यावर राहुल बोंद्रे यांनी निष्काळजी करणाऱ्या कंत्राटदारावर व तालुका क्रीडा अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या जलतरण तलावाचा कंत्राट सुरुवातीला एका अनुभवी कंपनीला देण्यात आला होता मात्र या कंपनीची हकालपट्टी करून आमदारांच्या मर्जीतल्या एका कार्यकर्त्याला हा कंत्राट दिल्याचा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला. जलतरण चालवण्याचा कुठलाही अनुभव नसताना हा कंत्राट दिल्याचे बोंद्रे म्हणाले. पोहणाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लाइफ गार्ड, जॅकेट व इतर अन्य गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही बोंद्रे यांनी केला आहे. ही निष्काळजी दोन भावी डॉक्टरांच्या जीवावर बेतल्याचे म्हणत कंत्राटदार, दुर्लक्ष करणारी तालुका क्रीडा समिती व तालुका क्रीडा अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राहुल बोंद्रे यांनी केली आहे...