खामगाव MIDC मध्ये "एफ डी ए" चा दणका! ३ कोटी ५१ लाखांचं बोगस खाद्यतेल जप्त..
खामगाव MIDC मधील A-14 प्लॉटवरील AM OELS PVT. LTD. या कंपनीत गेल्या अनेक दिवसांपासून विनापरवाना खाद्यतेलाचे उत्पादन सुरु असल्याची गोपनीय माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA च्या पथकाने कंपनीवर अचानक छापा टाकला. तपासणीत कंपनीकडे खाद्यतेल उत्पादनाचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कंपनीच्या गोदामात मोठ्या टाक्यांमध्ये साठवून ठेवलेले सुमारे साडेतीन कोटी रुपये किमतीचे निकृष्ट आणि बोगस खाद्यतेल आढळले. या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, "विनापरवाना आणि मानकांचे पालन न करता खाद्यतेलाचे उत्पादन सुरु होते.
नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. हा संपूर्ण साठा आम्ही सील केला आहे."सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीने यापूर्वी मोठ्या प्रमाणात हे बोगस तेल बाजारात वितरित केले आहे. हे तेल बुलढाणा जिल्ह्यासह कुठे-कुठे पाठवण्यात आले, कोणत्या किराणा दुकानदारांना किंवा हॉटेल व्यावसायिकांना विकले गेले, याचा शोध आता प्रशासन घेत आहे. वितरित झालेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खामगाव MIDC मधील बोगस कारभार चव्हाट्यावर आला असून, भेसळखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.