बाप शेतकऱ्यांसाठी लढतोय, आता लेकही मैदानात उतरली! दहावीत शिकणाऱ्या यज्ञजाच्या भाषणाने रविकांत तुपकर गहिवरले; लेकीच्या शब्दांतून उमटल्या शेतकऱ्यांच्या वेदना!
मुलीचं भाषण सोशल मीडियावर शेअर करताना तुपकर म्हणाले, 'माझं मन अभिमानाने भरून आलंय...' दुष्काळ संघर्ष यात्रेत बाप-लेकीच्या नात्याचा भावनिक क्षण!
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी रविकांत तुपकर यांनी १४ नोव्हेंबरपासून मलकापूर येथून दुष्काळ संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतून जाणाऱ्या या यात्रेचा समारोप ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यातील महाएल्गार मोर्चाने होणार आहे. या यात्रेत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांचे कुटुंबीयदेखील सहभागी झाले आहेत. मात्र, या सगळ्यांत लक्ष वेधून घेतले ते त्यांच्या दहावीत शिकणाऱ्या लेकीने!
'बाबा तुमच्यासाठी लढतायत, मग तुम्ही घरात बसून कसे चालेल?'
यज्ञजाने आपल्या भाषणाची सुरुवात स्वतःची ओळख करून देत केली. आपण आणि आपला भाऊ सकाळपासून बाबांच्या दुष्काळ संघर्ष यात्रेत सहभागी असल्याचे तिने सांगितले. कर्नाटकातून प्रेम चौगुले यांच्यासारखी मंडळी, गजभाऊ कावरखे, नामदेव पतंगे यांच्यासह अनेक जण शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी येत असल्याचा उल्लेख करत तिने शेतकऱ्यांनाच थेट सवाल केला."इतक्या लांबून लोक तुमच्यासाठी इथे येत आहेत. तुमच्यासाठी लढत आहेत आणि तुम्ही मात्र घरात बसून जेवण करून झोपत असाल, तर या लढ्याला काय अर्थ राहणार? ही तुमची लढाई आहे. तुम्हालाच या लढाईत सहभागी व्हावं लागेल," अशा शब्दांत यज्ञजाने शेतकऱ्यांना संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन केले.
सरकारलाही विचारला जाब; दहावीतल्या लेकीची राजकीय समज चर्चेत!
विशेष म्हणजे, यज्ञजाने केवळ भावनिक आवाहन केले नाही, तर दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. एल निनोच्या पार्श्वभूमीवर दुष्काळसदृश संकटाची पूर्वकल्पना असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी आधीच उपाययोजना आणि मदतीचे नियोजन का केले नाही, असा सवाल तिने केला."संकट येणार असल्याची माहिती सरकारला आधीपासून होती. मग शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई किंवा योजना का आणल्या नाहीत? सरकारने शेतकऱ्यांना संकटाचा सामना करण्यासाठी वाऱ्यावर सोडून दिलं," अशा शब्दांत तिने आपली भूमिका मांडली.दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या तोंडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत व्यक्त होणारी ही समज आणि आक्रमकता लक्षवेधी ठरली.
'आपण झुकायचं नाही, सरकारला झुकवायचं!'
यज्ञजाने आपल्या भाषणात तरुणाईच्या ताकदीचाही उल्लेख केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनमत तयार करण्याची ताकद तरुणांमध्ये असल्याचे सांगत तिने उपस्थितांना सक्रिय होण्याचे आवाहन केले."आपण सगळ्यांनी एकजुटीने लढलं पाहिजे. सोशल मीडियावर सक्रिय राहिलं पाहिजे. पोस्ट शेअर केल्या पाहिजेत. आपला आवाज मोठा केला पाहिजे. आपण त्यांच्यासमोर झुकायचं नाही, त्यांना आपल्यासमोर झुकवायचं आहे," असे म्हणत यज्ञजाने आपल्या भाषणात आक्रमकतेची धार आणली. याचवेळी ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात होणाऱ्या महाएल्गार मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही तिने केले.
लेकीचं भाषण ऐकून बापाचं मन अभिमानाने भरून आलं!
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढणारे रविकांत तुपकर अनेकदा सरकारविरोधात कठोर भूमिका घेताना दिसतात. मात्र, आपल्या लेकीच्या भाषणाने त्यांच्या मनातील हळवा बापही समोर आला.यज्ञजाचे भाषण तुपकर यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केले. त्यासोबत लिहिलेल्या शब्दांतून लेकीविषयीचा अभिमान आणि तिच्या संवेदनशीलतेबद्दलचे समाधान व्यक्त झाले. "तिच्या शब्दांतून शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांच्या वेदना आणि संघर्षाची तिला असलेली जाणीव पाहून मन अभिमानाने भरून आलंय. या शेतकरी लढ्याला लेकीची मिळालेली ही खंबीर साथ निश्चितच नवी ऊर्जा आणि बळ देणारी आहे," अशा भावना रविकांत तुपकर यांनी व्यक्त केल्या.
बापाचा संघर्ष लेकीनेही समजून घेतला...
रविकांत तुपकर यांचा शेतकरी प्रश्नांवरील संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे. आंदोलनाच्या निमित्ताने घरापासून दूर राहणे, गावोगावी फिरणे, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकणे आणि त्यांच्या न्यायासाठी सरकारशी संघर्ष करणे हा त्यांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. या सगळ्याचा परिणाम कुटुंबावरही होत असणारच. मात्र, या संघर्षाकडे केवळ वडिलांचे काम म्हणून न पाहता त्यामागील शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न यज्ञजाच्या भाषणातून दिसून आला.
वडिलांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या या लेकीने स्वतःच्या शब्दांत शेतकऱ्यांना लढण्याचे आवाहन केले. तिच्या भाषणात बालसुलभ निरागसता होती, तशीच शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दलची अस्वस्थताही होती.
शेतकऱ्यांच्या लढ्याला आता लेकीचीही साथ!
दुष्काळ संघर्ष यात्रेच्या निमित्ताने तुपकर पिता-पुत्रीच्या नात्यातील एक वेगळा पैलू समोर आला आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सरकारविरोधात संघर्ष करणारा बाप, तर दुसऱ्या बाजूला त्या संघर्षाचा अर्थ समजून घेत शेतकऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न करणारी त्याची लेक! यज्ञजाच्या भाषणाने शेतकरी आंदोलनाला एक भावनिक किनार मिळाली आहे. बापाच्या संघर्षाचा वारसा केवळ नावापुरता नाही, तर शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याच्या संवेदनशीलतेतूनही पुढे जात असल्याचे या प्रसंगाने दाखवून दिले. त्यामुळे दुष्काळ संघर्ष यात्रेतील हे बाप-लेकीचे भावनिक नाते सध्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.