शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाऐवजी फळबाग, भाजीपाला व आधुनिक लागवडीकडे वळावे! आर्थिक स्तर उंचावण्यासाठी फायदेशीर ; शासकीय योजनांचा घ्या लाभ! जिल्हाधिकारी तथा जिल्हा कृषी अधिकारी यांचे आवाहन...
Jul 5, 2025, 14:21 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आता पारंपरिक पीकपद्धतीऐवजी आधुनिक आणि अधिक फायदेशीर शेतीकडे वळण्याची गरज आहे. कापूस आणि सोयाबीन या पारंपरिक पिकांवर अति अवलंबित्व व अनेकदा अनिश्चित हवामान, बाजारातील चढउतार आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱी आर्थिक संकटात सापडतात. तर दुसरीकडे यावर मात करत फळबाग, भाजीपाला, बियाणे उत्पादन, चिया लागवड आणि रेशीम शेती सारख्या नगदी पिकांची लागवड करुन आर्थिक स्तर उंचावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाऐवजी फळबाग, भाजीपाला व आधुनिक लागवडीकडे वळावे, आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
बुलढाणा जिल्ह्याची जमीन आणि हवामान अनेक विविध पिकांसाठी अनुकूल आहे. तरीही, बहुतेक शेतकरी कापूस आणि सोयाबीन पीकांवर अवलंबून राहतात. या पिकांवर येणारे रोग, किडींचा प्रादुर्भाव आणि हमीभावाची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर, शेतीत विविधता आणणे ही काळाची गरज आहे. यासाठी नव्या संधी, नवा विचारांची गरज असून फळबाग लागवड, भाजीपाला उत्पादन, बियाणे उत्पादन, चिया लागवड, रेशीम शेती यांसारख्या पिकांमधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल. फळबाग लागवडीत आंबा, पेरू, डाळिंब, सीताफळ इ. आणि भाजीपाला उत्पादनात स्थानिक आणि शहरी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या भाजीपाल्याचे उत्पन्न घ्यावे. याशिवाय, पिकांच्या प्रमाणित बियाण्यांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. बियाणे उत्पादन हे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असले तरी, यात अधिक चांगला नफा मिळण्याची क्षमता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठे आणि कंपन्यांच्या मार्गदर्शनाखाली बियाने उत्पादन घ्यावे. यासोबतच, चिया लागवड, रेशीम शेती (मलगोळी पालन) हे शाश्वत उत्पन्नाचे अत्यंत फायदेशीर साधन आहे. ही शेती आता जिल्ह्यात विविध भागांत राबविण्यात येत आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत रेशीम लागवड हा एक उत्तम पर्याय ठरत असल्याने शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे.
शासकीय योजनांचा लाभ घ्या:
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी विभागाच्या योजना कार्यान्वित आहेत. फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचन आणि इतर आधुनिक शेती पद्धतींसाठी विविध योजना आणि अनुदान उपलब्ध करून दिला जात आहे. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
पारंपरिक पिकांवरील अवलंबित्व कमी करून, फळबाग, भाजीपाला, बियाणे उत्पादन, चिया लागवड आणि रेशीम शेती सारख्या पर्यायांचा अवलंब केल्यास बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
आर्थिक ताळमेळानुसार पारंपरिक पिकांवरील अवलंबित्व कमी करून आधुनिक, नगदी आणि मागणी असलेल्या पिकांकडे वळणे हे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरत आहे. या बदलामुळे शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर बनत आहे.
"बुलढाणा जिल्ह्याच्या शेतकरी बांधवांनो, पारंपरिकतेला फाटा देत आधुनिकतेचा स्वीकार करा. फळबाग, भाजीपाला, बियाणे उत्पादन, चिया लागवड आणि रेशीम शेती सारख्या पीक पद्धती आपली शेती समृद्ध करतील आणि आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणतील!" -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, बुलढाणा
"बुलढाणा जिल्ह्याच्या प्रगतीचा मार्ग शेतीच्या आधुनिकीकरणातून जातो. पारंपरिक पिकांच्या पलीकडे जाऊन, फळबाग, भाजीपाला आणि नगदी पिकांच्या लागवडीचा स्वीकार करा. शासन तुमच्या पाठीशी आहे, चला एकत्र येऊन जिल्ह्याला समृद्ध करूया!"
- जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, बुलढाणा.