‘एक रुपयाच्या’ पीक विम्याला शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद; आता मोठा हप्ता भरायची वेळ येताच पाठ फिरवली! बुलडाण्यात वर्षभरात तब्बल १ लाख शेतकरी विम्यापासून दूर!

 खरीप २०२६ मध्ये विमा उतरवलेल्या क्षेत्रातही १.९४ लाख हेक्टरची घट; मेहकर तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीकविमा टाळला

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि अवकाळीच्या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणाऱ्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेपासून यंदा बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल एक लाखाहून अधिक शेतकरी दूर राहिल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप २०२६ मध्ये पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख २ हजार ३९९ ने घटली आहे. विमा उतरवलेल्या क्षेत्रातही तब्बल १ लाख ९४ हजार ५८३ हेक्टरची घट झाली आहे.या आकडेवारीमुळे ‘एक रुपयात पीकविमा’ असताना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आता विम्यासाठी स्वतःच्या खिशातून मोठी रक्कम भरावी लागताच निर्माण झालेली उदासीनता यातील फरक प्रकर्षाने समोर आला आहे.

एक रुपयात विमा असताना मोठा प्रतिसाद... आता मात्र शेतकरी म्हणतोय, ‘कशाला काढायचा?’

गेल्या वर्षीपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपयात पीकविमा काढण्याची सुविधा होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे विमा संरक्षण करून घेतले होते. मात्र, यंदा शेतकऱ्यांना विम्याच्या हप्त्यापोटी मोठी रक्कम भरावी लागत असल्याने अनेक शेतकरी पीकविम्यापासून दूर राहिल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.
पिकाला विमा हवा, पण त्यासाठीचा खर्च परवडत नाही, अशी शेतकऱ्यांची मानसिकता या घटलेल्या आकडेवारीमागे असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी २.७० लाख शेतकरी; यंदा संख्या थेट १.६८ लाखांवर!

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या प्रशासकीय डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार, खरीप २०२५ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७१३ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. या शेतकऱ्यांनी ४ लाख १२ हजार १८४ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला होता.यासाठी एकूण सकल प्रीमियम २३१.१८ कोटी रुपये होता.मात्र, खरीप २०२६ मध्ये विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटून १ लाख ६८ हजार ३१४ इतकी झाली. विमा उतरवलेले क्षेत्रही घटून २ लाख १७ हजार ६०१ हेक्टर इतकेच राहिले.
अर्थातच, वर्षभरात १ लाख २ हजार ३९९ शेतकरी आणि १ लाख ९४ हजार ५८३ हेक्टर विमाक्षेत्र घटले.

मेहकरमध्ये सर्वाधिक ‘नो रिस्पॉन्स’; १७ हजारांहून अधिक शेतकरी विम्यापासून दूर

तालुकानिहाय आकडेवारी पाहिली तर मेहकर तालुक्यात सर्वाधिक १७ हजार २२ शेतकरी पीकविम्यापासून दूर राहिले.
त्यानंतर लोणारमध्ये १५ हजार ८८३, तर खामगावमध्ये ८ हजार १४२ शेतकऱ्यांची संख्या घटली आहे.यामुळे यंदा पीकविमा योजनेतील घट ही केवळ शेतकऱ्यांच्या संख्येपुरती मर्यादित नसून विमा क्षेत्र आणि प्रीमियमच्या रकमेतही स्पष्टपणे दिसून येत आहे.

प्रीमियममध्येही जवळपास ४० कोटींची घट!

खरीप २०२५ मध्ये जिल्ह्यातील पीकविमा योजनेचा एकूण सकल प्रीमियम २३१.१८ कोटी रुपये होता. यंदा तो घटून १९१.७२ कोटी रुपये झाला आहे.म्हणजेच प्रीमियममध्ये तब्बल ३९.४६ कोटी रुपयांची घट झाली आहे.
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या खिशातून भरल्या जाणाऱ्या हिश्श्यातही मोठी घट झाली आहे. खरीप २०२५ मध्ये शेतकरी हिस्सा ३६.७४ कोटी रुपये होता. यंदा तो २६.४५ कोटी रुपयांवर आला आहे. म्हणजेच शेतकरी हिस्स्यात जवळपास १०.२९ कोटी रुपयांची घट झाली आहे.

‘विमा काढायचा की खर्च वाचवायचा?’ शेतकऱ्यांसमोर नवा पेच

पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी संरक्षणाचे कवच म्हणून महत्त्वाची असली तरी विमा हप्ता भरण्याचा आर्थिक भार वाढल्यास शेतकरी त्यापासूनच दूर जात असल्याचे बुलडाणा जिल्ह्यातील आकडेवारी सांगते.
एकीकडे पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट आणि विविध नैसर्गिक संकटांचा धोका कायम आहे. दुसरीकडे उत्पादन खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत पीकविम्याचा हप्ता भरण्यासाठीही मोठी रक्कम खर्च करावी लागणार असेल, तर अनेक शेतकरी त्याकडे पाठ फिरवत असल्याचे दिसते.

एक रुपयात विमा असताना लाखो शेतकरी सहभागी झाले; आता मोठी रक्कम भरावी लागताच लाखो शेतकरी बाहेर पडले—पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीवर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक क्षमतेवर विचार करायला लावणारी ही आकडेवारी आहे.शेतकऱ्याला विमा हवा आहे; पण तो त्याच्या खिशाला परवडणाऱ्या दरात हवा आहे, हा संदेश या आकडेवारीतून स्पष्टपणे समोर येत आहे.