मुंबईत शेतकरी आंदोलन आणखी भडकले! झाडावरील आंदोलन सुरू असतानाच शेतकरी समुद्रात उतरले; मंत्रालय परिसरात पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर...
यापूर्वी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न करत सातबारे फेकले, सोयाबीन आणि कापूस उधळत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर मंत्रालयासमोरील झाडावर चढलेल्या कार्यकर्त्यांनी गळ्यात फास अडकवून ठिय्या मांडल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती. हे आंदोलन अद्याप सुरू असतानाच दुसरीकडे काही शेतकरी मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्रात उतरल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.
समुद्रात उतरलेल्या शेतकऱ्यांना काही वेळाने पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. मात्र एका मागोमाग एक वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांमुळे मंत्रालय, विधानभवन आणि परिसरातील संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलनकर्त्यांवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.दरम्यान, सरकारकडून अद्याप ठोस निर्णय जाहीर न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे मुंबईतील शेतकरी आंदोलन आणखी कोणते वळण घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.