EXCLUSIVE पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा; शेळगाव आटाेळच्या शेतकऱ्याला नुकसानभरपाईपाेटी मिळाले ७३.६९रुपये; भरपाई मिळवून देण्याचे श्रेय घेण्यातच लाेकप्रतिनिधीची धन्यता; प्रत्यक्ष चित्र वेगळेच..!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :अवकाळी पावसानंतर हुमनी अळीच्या चक्रव्युहात अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिक विमा कंपनीकडून थट्टा सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. हजाराे रुपये नुकसान झालेले असताना पिक विमा कंपनीने शेळगाव आटाेळ येथील शेतकऱ्याच्या खात्यात ७३.६९ रुपये जमा करून त्यांच्या जखमेवर मिठ चाेळले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी आपणच पुढाकार घेतल्याचा दावा जिल्ह्यातील नेत्यांनी केला हाेता. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेणारी रक्कम पाहता या नेत्यांच्या दावे पाेकळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२०२५ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा याेजना मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ६ हजार ६०७ शेतकऱ्यांना १४ कोटी २४ लाख ११ हजार २३१ रुपये मंजुर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा हाेण्यास सुरूवात झाली आहे. पीक विमा मंजूर हाेताच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव,मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आदींनी आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच ही रक्कम मंजूर झाल्याचा दावा केला हाेता. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना शंभर रुपयांच्या आत मदत जमा हाेत असल्याने या नेत्यांच्या दाव्यातील हवाच निघाली आहे. शेळगाव आटाेळ येथील भगवान राजाराम आटोळे या शेतकऱ्याच्या खात्यात ७३.६९ रुपयांची मदत जमा झाली आहे. प्रमाेद इंगळे या शेतकऱ्याला ११७.९० रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. पांडुरंग देशमुख यांना १४१.४९ रुपयांचा विमा भरपाई कंपनीकडून मिळाली आहे. या शेतकऱ्यांचे हजाराे रुपयांचे नुकसान झालेले असताना विमा कंपनीने शंभर ते दाेनशे रुपयांच्या आत मदत जमा करून त्यांची थट्टाच केली आहे. त्यामुळे, या शेतकऱ्यांना नुकसान झाले त्याप्रमाणे भरपाई मिळावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. 
खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यात येत आहे. १०० रुपयांच्या आत मदत देवून विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना नुकसानाप्रमाणे मदत द्यावी अशी आमची मागणी आहे.(भगवान आटोळे, शेतकरी)