शेतकऱ्याचे स्पष्टीकरण : आमदार संजय गायकवाड यांनी दिलेले दोन्ही बैल उत्तमच अफवांवर शेतकऱ्याचा खुलासा; शेतकरी दांपत्य म्हणाले "आमदारांचे उपकार विसरू शकत नाही"

 
 लातूर (लाईव्ह ग्रुप नेटवर्क) :  आमदार संजय गायकवाड यांनी दिलेले दाेन्ही बैल चांगलेच आहेत असे मत लातूर जिल्ह्यातील हाडाेळती येथील शेतकरी अंबादास पवार यांनी सांगितले.  काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आमदारांनी दिलेला एक बैल मारका असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी हाडोळती (ता. लातूर) येथील शेतकरी अंबादास पवार व त्यांच्या पत्नीची बैलजोड नसल्याने स्वतः औत ओढतानाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या दृश्याने भावूक झालेले आमदार गायकवाड यांनी या शेतकऱ्याला मोफत बैलजोडी देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात बांधावर जाऊन त्यांनी बैलजोडी सुपूर्त केली होती. त्यातील एक बैल मारका असल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशीत झाले हाेते.

मात्र, शेतकरी अंबादास पवार यांनी दाेन्ही बैल चांगले असून आमदार संजय गायवाकड यांचे उपकार विसरू शकत नसल्याचे म्हटले आहे.  त्यांनी दिलेले किराणा साहित्य अजुनही शिल्लक असल्याचे पवार यांच्या पत्नीने सांगितले. शिंदे सेनेच्या एका कार्यकर्त्यांने शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच आमदार संजय गायकवाड यांच्याशी बाेलणेही करून दिले. त्यावेळी दाेन्ही बैल चांगले असून गावात अशी बैलजाेडी कुणाकडेच नसल्याने एक बैल मारका असल्याची अफवा पसरवण्यात आल्याचे शेतकऱ्याने सांगितले. तसेच मदत केल्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांचे आभारही मानले.