कोरड्या दुष्काळाने शेतकरी उध्वस्त; हेक्टरी १ लाखांची मदत द्या! बुलढाण्यात उद्धवसेनेचा हजारोंच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चा,
अरविंद सावंतांचा सरकारला थेट सवाल – ‘उद्योगपतींचे कर्ज माफ करता, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का?’

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते आमदार नितीन देशमुख, संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके आणि जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. जिजामाता प्रेक्षागार मैदानातून सुरू झालेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. हातात करपलेले सोयाबीन, पिकांची अवशेष आणि मदतीच्या मागणीचे फलक घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीने दुष्काळाची भीषणता अधोरेखित केली. संगम चौक, जयस्तंभ चौक आणि बाजार लाईन मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

मोर्चापूर्वी जिजामाता प्रेक्षागार मैदानावर झालेल्या सभेत शिवसेनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला धारेवर धरले. खासदार अरविंद सावंत म्हणाले की, शेतकऱ्यांचा आक्रोश घेऊन हा मोर्चा काढण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज भीषण परिस्थिती असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संकटाची तीव्रता ओळखून सर्वात आधी विशेष अधिवेशनाची मागणी केली आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र, सध्याचे सरकार केवळ घोषणाबाजी करत असून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप त्यांनी केला. गतवर्षीच्या पीकविम्याची रक्कमही अद्याप मिळालेली नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेच्या घोषणा केल्या जातात, मात्र नंतर लाखो महिलांची नावे योजनेतून वगळली जातात, अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात आली होती, असे सांगत उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते, मग शेतकऱ्यांच्या बाबतीत पुनर्गठनाचा निर्णय का, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या वतीने जिल्हा आणि तालुकास्तरावर शेतकरी मदत केंद्रे उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार नितीन देशमुख यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या तीस वर्षांत इतके मोठे संकट आले नसल्याचे सांगत, आज शेतकऱ्यांच्या घरात संध्याकाळी चूल कशी पेटणार, असा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून केवळ जुमलेबाजी सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी, हिंदुत्वाच्या नावावर मते मागणाऱ्या सरकारला दुष्काळग्रस्त शेतकरी हिंदू नाहीत का, असा सवाल केला. शेतकऱ्यांच्या मुलांना आणि शेतमजुरांच्या मुलांना रोजगार मिळत नसल्याने दुष्काळामुळे परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केल्यानंतरच सरकारला जाग आल्याचा आरोप करत, शासन निर्णयात नेमकी मदत काय मिळणार, हे स्पष्ट केलेले नाही, असे ते म्हणाले. सरकारने ठोस मदत न दिल्यास आगामी काळात आंदोलन तीव्र करून प्रसंगी समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला.
संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी सरकारच्या दुष्काळ घोषणेवर टीका करत, ही घोषणा प्रत्यक्ष मदतीशिवाय कोरडी ठरल्याचे म्हटले. बुलढाणा जिल्ह्यात केंद्रीय मंत्री, राज्यात कॅबिनेट मंत्री आणि सहा आमदार सत्ताधारी पक्षाचे असतानाही केंद्रीय मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळाबाबत पत्रव्यवहार करावा लागतो, असा टोला त्यांनी लगावला. एनडीआरएफच्या मदतीतूनही शेतकऱ्यांना ठोस दिलासा मिळेल, याची शाश्वती नसल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा झाल्याशिवाय त्यांना या संकटातून सावरणे कठीण असल्याचे ते म्हणाले.

आमदार सिद्धार्थ खरात यांनी फडणवीस सरकारने केवळ निर्णय काढून दुष्काळ जाहीर केला, मात्र शेतकऱ्यांना कोणती मदत मिळणार, हे स्पष्ट केले नसल्याचा आरोप केला. पंचनाम्यांचे नाटक बंद करून थेट नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही, तर आत्महत्यांसारख्या घटना वाढण्याची भीती असून, त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे खरात म्हणाले.
राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनीही महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप करत, कोरडा दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात किती मदत मिळणार, याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही, असे त्या म्हणाल्या. ‘लबाडाच्या घरचं आमंत्रण असल्यासारखं’ सरकारचं हे धोरण असल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात दुष्काळाची पाहणी करून सरकारने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली होती. शिवसेनेने राज्यभर आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारला जाग आली, असे त्या म्हणाल्या. २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ अंतर्गत पंचनाम्यांचे आदेश देण्यात आले असले, तरी पंचनाम्यांच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडकवण्याऐवजी सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी प्रास्ताविकात शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना सरकारकडून थेट मदत मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार व्यक्त करत आगामी काळात रस्त्यावरचा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी हातात करपलेली पिके घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाल्याने शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि शिष्टमंडळाने प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या मोर्चात अकोला जिल्हाप्रमुख दातकर, मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे, गोपाल बच्छीरे, जिल्हा समन्वयक गजानन धांडे, जिल्हा संघटक सुमित सरदार, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, विलास सुरडकर, बद्री बोडखे, लखन गाडेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, महिला आघाडी संघटिका सागरताई पुरी, उर्मिलाताई ठाकरे, जिल्हाप्रमुख विजयाताई खडसन, किसान सेनेचे गजानन उबरहंडे, तालुकाप्रमुख विजय इतवारे, विजय इंगळे, श्रीकिसन धोंडगे, निंबाजी पांडव, दादाराव खार्डे, आत्माराम शेळके, राजू बुधवत, प्रा. सिद्धेश्वर आंधळे, सुनील भाग्यवंत, शहरप्रमुख विजय राऊत, श्रीराम झोरे, उल्हास भुसारे, अजय शिवरकर, गजानन जाधव, मोहित राजपूत, मनोज चंदन, श्रीकांत जाधव, श्याम सावळे, सामाजिक न्याय आघाडीचे मिलिंद गवई, संजय शिंदे, शेख रफिक, रामशंकर सोनुने, प्रतीक्षा पिंपळे, भूषण बिरड, राहुल कराळे, आकाश घोडे आणि अनिल नरोटे यांच्यासह हजारो शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.