शेतकऱ्यांनो सावधान! शेतातील सोयाबीनची सुडी काढून सोयाबीन घरी सुरक्षित ठिकाणी ठेवावी. अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांचे आव्हान..

 
 चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या भोवती अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकटे गोंगावत असतानाच चोरटे आणि जळक्या लोकांचे उपद्रव दिसून येत आहे. या संकटातून वाचून शेतकरी पिकाला पोटच्या लेकराप्रमाणे जपतो. परंतु समाजातील काही जळक्या प्रवृत्तीच्या लोकांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. याची काळजी म्हणून अंधेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
शेतकरी वर्षभर आपल्या लेकरा, बाळासह सर्व कुटुंब शेतामध्ये जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस राबत असतो. वर्षभर शेतीसाठी खते, बी - बियाणे औषधी यासाठी बँका तसेच खाजगी सावकारांकडून घेतलेले पैसे याचा बराच खर्च झालेला असतो. शेतातील पीक निघाल्यानंतर पिकाच्या भरवशावर या लोकांचे कर्ज शेतकरी देतो. परंतु निसर्गापासून बचावलेला, हातात तोंडाशी आलेला घास मात्र समाजातील काही जळक्या प्रवृत्तीच्या लोकांमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. या घटनेमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतो.
दिवाळीच्या सणासुदीचे दिवस सुरू होतील. शेतकरी सोयाबीन काढून लोकांच्या घरी पैसे येतील अशा वेळेस सणासुदीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरू होत असतो. तरी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर पैसे व्यवस्थित जाता येताना सांभाळून घरी आणावे .बँकेत जाता येताना आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवावे. असे आवाहन अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी केले आहे. ठाणेदार विकास पाटील यांनी चालू वर्षी सोशल मीडियावर एक व्हिडिओ बनवून सोयाबीन जाळण्यासंबंधीची जनजागृती केली होती. मागील वर्षी सात ते आठ सूडया जाळण्यात आल्या होत्या. परंतु चालू वर्षी हा प्रकार फक्त एकाच ठिकाणी गुंजाळा येथेच झालेला आहे. त्यात देखील संशयित आहे. तरी यावर्षी सदर व्हिडिओ मुळे आणि अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बऱ्याच गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्यामुळे सोयाबीन तसेच इतर चोरीचे प्रमाण कमी झाले आहे.
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या सोयीनुसार शेतातील सोयाबीनच्या सुड्या काढून सोयाबीनचा माल सुरक्षित घरी आणून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. जेणेकरून सोयाबीनच्या सुड्या जाळण्याच्या व सोयाबीन चोरी होण्याच्या घटना घडणार नाही. याविषयी काही संशयित घटना लक्षात आल्या तर पोलिसांना कळवावे. सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करावेत असे सुद्धा आवाहन त्यांनी केले.