तुपकरांची प्रकृती खालावल्याने शेतकरी आक्रमक! सिंदखेडराजात तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक ; डॊणगावात अडविला महामार्ग
Sep 6, 2024, 19:27 IST
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मातृतीर्थ सिंदखेडराजात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन गेल्या ३ दिवसांपासून सुरू आहे. सोयाबीन -कापसाची दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून शेतीपिकांच्या संरक्षणासाठी मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.. परंतु रविकांत तुपकरांची प्रकृती खालवल्याने आता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सिंदखेडराजा येथे दुपारी शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हातात विशाची बॉटल व विविध फलक घेऊन शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडक दिली. सरकार आणि प्रशासन पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे, प्रशासनाला शेतकऱ्यांकडून उद्रेक करून घ्यायचा आहे का..? असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावत चालली आहे, या आंदोलनाची तत्काळ दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशाही शेतकऱ्यांनी यावेळी दिला तर मेहकर तालुक्यातील डॊणगाव येथे शेतकऱ्यांनी नागपूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. ठीक-ठिकाणी शेतकरी व कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत. शेतकरी व कार्यकर्त्यांच्या भावना ज्वलंत झाल्या असून कोणत्याही क्षणी हे आंदोलन पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे डॉक्टरांच्या चमूने तुपकर यांची तपासणी केली. त्यावेळी रक्तातील साखर कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.