विजांच्या कडकडाटात शेतकरी महिला ठार! वीरपांग्र्यात दुर्दैवी घटना; पावसामुळे शेतीपिकांचेही मोठे नुकसान

 

 

बिबी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज सोमवार, दिनांक १२ मे २०२५ रोजी बिबी परिसरात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या अचानक बदललेल्या हवामानाने शेतकऱ्यांची धावपळ उडवली. वीरपांग्रा येथे शेतकरी महिला सौ. रजना संदीप चव्हाण (वय ३५) या कापूस वेचणीसाठी मजूर महिलांसह शेतात काम करत असताना त्यांच्यावर वीज कोसळली.
पावसाने जोर धरल्याने त्यांनी बचावासाठी लिंबाच्या झाडाचा आसरा घेतला, पण दुर्दैवाने झाडावर वीज कोसळली आणि सौ. चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या पावसामुळे सामान्य नागरिकांना उन्हाच्या तापापासून दिलासा मिळाला असला तरी, लग्नसराईतील नियोजन कोलमडले आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
कांदा, भुईमूग आणि उन्हाळी ज्वारी पिकांचे नुकसान झाले असून, काढणीला आलेले भुईमूग पावसात भिजल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामानातील हा अचानक बदल शेतीसाठी घातक ठरत असून, शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि हताशा पसरली आहे.
प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करत आहेत.