झाडावरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू! फांदी तोडण्यासाठी चढले होते झाडावर...मलकापूर तालुक्यातील घटना

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर तालुक्यातील दुधलगाव गावात एक हळहळ करणारी घटना घडली. झाडावरून पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मृतक शेतकऱ्याचे वय ६१ वर्ष होते.

सध्या शेतकऱ्यांची मशागतीची कामे सुरू आहेत. दुधलगाव येथील शेतकरी प्रमोद श्रीधर देशमुख हे शेतातील निंबाच्या झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढले होते. मात्र फांदी तोडतांना तोल जाऊन ते खाली पडले. त्यांना प्रचंड मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची फिर्याद त्यांचा मुलगा समीर देशमुख यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास मपोहेकॉ सविता पाटील करीत आहेत.