डोळ्यांचे पारणे फेडणारी दहीहंडी! चिखलीत महायुतीच्या उत्सवाचा थरार; हजारो चिखलीकरांच्या जल्लोषाने छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुमला!
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची उपस्थिती, आमदार श्वेता महाले पाटील यांचा जोशपूर्ण सहभाग; केतकी माटेगावकर, ईशिता दत्ता अन् अँकर भाविकाच्या अदाकारीने तरुणाईला भुरळ
गोविंदा पथकांनी हंडी फोडण्यासाठी एकावर एक मानवी मनोरे रचण्यास सुरुवात करताच उपस्थितांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या. “गोविंदा आला रे आला... गोपाळा आला!” या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. प्रत्येक थरासोबत वाढणारा थरार, गोविंदांच्या प्रयत्नांना मिळणारी हजारो चिखलीकरांची दाद आणि ढोल-ताशांच्या गजराने वातावरण अक्षरशः भारावून गेले. अखेर हंडी फुटताच गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषाने चिखलीकरांनी हा अविस्मरणीय क्षण अक्षरशः डोक्यावर घेतला.
या सोहळ्याला मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आवर्जून उपस्थिती लावत गोविंदा पथकांचा आणि चिखलीकरांचा उत्साह वाढविला. दहीहंडी हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून सामाजिक एकता आणि संघभावनेचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी चिखलीतील दहीहंडीच्या भव्य आयोजनाचे विशेष कौतुक केले. “प्रत्येक वर्षी मागील वर्षापेक्षा काहीतरी अधिक मोठे आणि वेगळे या दहीहंडीत पाहायला मिळते,” असे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे आणखी एक मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेत्री ईशिता दत्ता आणि अँकर भाविका यांची उपस्थिती. सेलिब्रिटींचे मंचावर आगमन होताच तरुणाईमध्ये उत्साहाची लाट उसळली. कलाकारांनी प्रेक्षकांशी साधलेला मनमोकळा संवाद, त्यांची अदाकारी आणि अँकर भाविकाचे दमदार सूत्रसंचालन यामुळे कार्यक्रमाची रंगत क्षणाक्षणाला वाढत गेली. डीजेच्या तालावर हजारो तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आमदार श्वेता महाले पाटील यांचा जोश ठरला विशेष आकर्षण! दहीहंडीच्या संपूर्ण सोहळ्यात आमदार श्वेता महाले पाटील यांचा उत्साह आणि गोविंदा पथकांना दिलेली प्रोत्साहनाची दाद उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. मंचावरून चिखलीकरांशी संवाद साधताना त्यांनी दहीहंडीच्या प्रतीकातून संघर्ष, एकजूट आणि विकासाचा संदेश दिला. “दहीहंडी फोडण्यासाठी जसे एकावर एक थर रचावे लागतात, तसेच जीवनातील प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अडचणीची एक-एक पायरी ओलांडावी लागते,” असे सांगत त्यांनी चिखलीकरांच्या प्रत्येक सुख-दुःखात सोबत राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
चिखलीच्या विकासासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या विविध विकासकामांचाही यावेळी उल्लेख झाला. रस्ते, पाणीपुरवठा, शेतरस्ते, एस.व्ही.एम. अभ्यासिका, धाड येथील अभ्यासिकेसाठी निधी, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधा, खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा तसेच चिखलीत प्रस्तावित भव्य शिवसृष्टी अशा विविध विकासकामांना गती देण्यासाठी त्यांचा सुरू असलेला पाठपुरावा अधोरेखित करण्यात आला. दहीहंडी म्हणजे केवळ हंडी फोडण्याचा उत्सव नव्हे, तर एकजूट, संघभावना आणि सामूहिक शक्तीचा उत्सव! याच भावनेतून चिखलीकरांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवत उत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. “चिखली थांबणार नाही! चिखली झुकणार नाही! चिखली विकासाच्या मार्गावरून मागे जाणार नाही!” या निर्धाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या भव्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, बुलढाणा माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, मेहकरचे माजी आमदार संजय रायमुलकर, सिंदखेडराजाचे माजी आमदार तोतारामजी कायंदे, जिल्हा सहकारी बँकेचे नवनियुक्त संचालक अंकुशरावजी पाटील, चिखली नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख, उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोविंदांचा थरार, चिखलीकरांचा जल्लोष, सेलिब्रिटींची रंगत, प्रतापराव जाधवांची उपस्थिती आणि श्वेता महाले पाटील यांचा जोश—या साऱ्यांचा भन्नाट संगम साधणारी चिखलीची महायुती दहीहंडी यंदा खऱ्या अर्थाने “भव्य-दिव्य” ठरली!