EXCLUSIVE"एका लग्नाची गोष्ट"! दिवठाण्याच्या लग्नाची सगळीकडे चर्चा! लग्नसोहळ्यात नवरदेव नवरीने केला मरणोत्तर "अवयवदाना"चा संकल्प....! विनोद आणि कविताची बातच न्यारी; जिवंत पणीच मिळवला "मोक्ष"...!
चि. विनोद हा दिवठाणा येथील श्रीमती कमलाबाई व कैलासवासी तुकाराम विक्रम इंगळे यांचा मुलगा. वधु चि.सौ.का कविता ही दिवठाणा येथीलच सौ. सविताबाई व श्री.तुकाराम बापूराव मोरे यांची कन्या..या दोघांचा विवाह सोहळा आज २० मे रोजी सायंकाळी दिवठाणा येथे मंगलमय वातावरणात पार पडला. चि.विनोदचा पिंड तसा सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्याचा..गणराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतांना विनोद हा समाजात अडल्या नडलेल्यांसाठी नेहमीच झटत असतो..आतापर्यंत अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळावी म्हणून विनोदने प्रयत्न केलेत. आ.सौ.श्वेताताई महाले, माननीय मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विद्याधरजी महाले यांच्या माध्यमातून विनोदने अनेक रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. हे काम करतांना विनोदने वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत अनेक बाबी अगदी जवळून अनुभवल्या..मरणोत्तर अवयवदान केल्यानंतर डोळ्यांसह इतर अवयवांचा उपयोग अनेक गरजू रुग्णांना होते. ही बाबही विनोदच्या लक्षात आली..आणि तेव्हाच विनोदने संकल्प केला तो मरणोत्तर अवयवदानाचा....
अर्धांगिनीने दिली समर्थ साथ.....
लग्न ठरल्यानंतर विनोदने ही बाब होणाऱ्या पत्नीला म्हणजेच कविताला सांगितली. आणि त्यावर कविताने देखील पतीच्या पावलावर पाऊल ठेवत मरणोत्तर अवयवदान करण्याची इच्छा दर्शवली..आणि आज लग्नाच्या मंडपातच वऱ्हाडी मंडळीच्या साक्षीने दोघांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प करीत जिवंतपणीच खऱ्या अर्थाने मोक्ष मिळवला...म्हणूनच तर म्हटलं विनोद आणि कविताची बातच न्यारी...