EXCLUSIVE यंदा ‘बुलडाणा लाइव्ह’च्या दिवाळी अंकातील जाहिरात निधी वंचितांच्या दिवाळीसाठी! जिल्ह्यातील २ हजार गरजू कुटुंबांपर्यंत माणुसकीचा दिवा पोहोचवण्याचा संकल्प;

 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, आदिवासी वस्त्या अन् पालावर संसार थाटणाऱ्या बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी अनोखा उपक्रम! तुम्हीही होऊ शकता सहभागी...

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दिवाळी म्हटली की घराघरांत आनंदाची लगबग सुरू होते. नवीन कपडे, फराळ, रोषणाई आणि लेकरांच्या चेहऱ्यावरील आनंद... पण याच जिल्ह्यात अशीही कितीतरी घरे आहेत, जिथे दिवाळी कशी साजरी करायची, हा प्रश्न नाही; तर उद्याची चूल कशी पेटवायची, हीच मोठी चिंता आहे. कुठे दुष्काळाने शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी फेरले, कुठे घरातील कर्त्या पुरुषाच्या आत्महत्येने संसाराचा आधार हिरावला, तर कुठे दुर्गम आदिवासी वस्त्यांतील कुटुंबे आजही मूलभूत गरजांसाठी संघर्ष करीत आहेत. अशा परिस्थितीत यंदाची दिवाळी केवळ आपल्या घरापुरती मर्यादित न ठेवता समाजातील वंचितांच्या आयुष्यातही आनंदाचा छोटासा दिवा लावण्याचा संकल्प ‘बुलडाणा लाइव्ह’ने केला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या दिवाळी अंकासाठी संकलित झालेला संपूर्ण जाहिरात निधी या सामाजिक उपक्रमासाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील किमान २ हजार गरजू कुटुंबांपर्यंत साडी-चोळी आणि आवश्यक किराणा साहित्याचे किट पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या माणुसकीच्या अभियानात जिल्हावासीयांनाही सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करतो आहोत..

जाहिरातींच्या उत्पन्नातून उजळणार गरजूंची दिवाळी!

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘बुलडाणा लाइव्ह’चा विशेष दिवाळी अंक प्रकाशित होणार आहे. मात्र, यंदाच्या अंकाला सामाजिक बांधिलकीची अनोखी जोड देण्यात आली आहे. दिवाळी अंकाच्या माध्यमातून संकलित झालेला संपूर्ण जाहिरात निधी गरजू कुटुंबांच्या दिवाळीसाठी समर्पित करण्यात येणार आहे. त्यामुळे या अंकात प्रसिद्ध होणारी प्रत्येक जाहिरात केवळ व्यावसायिक प्रसिद्धीचे माध्यम न राहता एखाद्या गरजू कुटुंबाच्या घरात आनंदाचा दिवा लावण्यासाठी हातभार ठरणार आहे. जाहिरातदारांच्या सहकार्यातून उभा राहणारा निधी थेट समाजातील वंचित घटकांसाठी उपयोगात आणण्याचा ‘बुलडाणा लाइव्ह’चा मानस आहे.

दुष्काळाच्या सावटात २ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न!

यंदा बुलडाणा जिल्ह्यावर दुष्काळाचे गंभीर सावट आहे. शेतातील पिके हातची गेल्याने अनेक शेतकरी कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबे, दुर्गम आदिवासी वस्त्यांतील बांधव, पालावरच संसार थाटून जगणारी कुटुंबे तसेच आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गरजू कुटुंबाला साडी-चोळी आणि दैनंदिन उपयोगाचे आवश्यक किराणा साहित्य असलेले एक किट देण्यात येणार आहे. एका किटसाठी साधारण एक हजार रुपये खर्च अपेक्षित असून, उपलब्ध निधी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून २ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.ही मदत म्हणजे संबंधित कुटुंबांच्या सर्व समस्या सोडविण्याचा दावा नाही. मात्र, सणासुदीच्या काळात कुणीतरी आपली आठवण ठेवली, समाज आपल्या पाठीशी उभा आहे, हा विश्वास निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न निश्चितच आहे.

कुणाच्या दुःखाचे प्रदर्शन नाही, कुणावर उपकारही नाहीत!

या उपक्रमामागे कुणाच्या गरिबीचे प्रदर्शन करण्याचा किंवा कुणावर उपकार केल्याचा आव आणण्याचा हेतू नाही. उलट समाजातील संवेदनशील आणि दानशूर हातांना गरजू कुटुंबांशी जोडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात आनंदाचे दिवे लावताना एखाद्या गरजू कुटुंबाच्या घरातही आनंदाची पणती पेटावी, एवढीच या अभियानामागची भावना आहे.

यापूर्वीही संकटग्रस्तांच्या मदतीला धावले ‘बुलडाणा लाइव्ह’!

जळगाव जामोद

‘बुलडाणा लाइव्ह’ने यापूर्वीही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहेत. दरवर्षी संस्थेचा वर्धापन दिन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना समर्पित करून संबंधित कुटुंबांना पेरणीसाठी बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांत अतिवृष्टीमुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना किराणा साहित्य व कपड्यांच्या माध्यमातून  कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या उपक्रमांचे खरे मानकरी प्रत्येक वेळी सहकार्य करणारे जिल्ह्यातील संवेदनशील नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि दानशूर बांधव आहेत. ‘बुलडाणा लाइव्ह’ हे केवळ गरजू आणि दानशूर यांच्यातील दुवा म्हणून काम करीत आहे.

तुम्हीही एखाद्या कुटुंबाच्या दिवाळीचा आनंद बनू शकता!

या माणुसकीच्या अभियानात समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी होता येणार आहे. व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, व्यावसायिक, नोकरदार, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक आपल्या क्षमतेनुसार योगदान देऊ शकतात. इच्छुकांना एका कुटुंबाच्या किटची जबाबदारी स्वीकारता येईल. तसेच दोन, पाच, दहा किंवा त्याहून अधिक कुटुंबांसाठीही मदत करता येईल. मदतीची रक्कम किती आहे, यापेक्षा त्यामागील आपुलकीची भावना अधिक महत्त्वाची असल्याचे ‘बुलडाणा लाइव्ह’चे मत आहे.

मदतीसाठी फोनपे आणि क्यूआर कोडची सुविधा!

बुलढाणा

या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी ‘बुलडाणा लाइव्ह’च्या अधिकृत क्यूआर कोडवर किंवा फोनपे क्रमांक 93713 03317 वर आपल्या इच्छेनुसार आर्थिक योगदान पाठवावे. त्यानंतर याच क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे आपले नाव, पत्ता आणि योगदानाची माहिती कळवावी. सहकार्य करणाऱ्या दात्यांची नावे त्यांच्या संमतीने ‘बुलडाणा लाइव्ह’वर प्रकाशित करण्यात येतील.

यंदा आपल्या घरात दिवाळीचा दिवा लावताना एक पणती गरजूंच्या घरासाठीही लावूया!

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याच्या घरात, कर्ता आधार गमावलेल्या कुटुंबाच्या अंगणात, दुर्गम आदिवासी वस्तीतील झोपडीत किंवा पालावर संसार करणाऱ्या बांधवांच्या आयुष्यात आनंदाचा एक छोटासा क्षण निर्माण करता आला, तरी या उपक्रमाचे सार्थक होईल. कारण दिवाळीचा खरा आनंद केवळ आपले घर उजळण्यात नाही, तर आपल्या प्रकाशातील थोडासा वाटा दुसऱ्याच्या अंधारलेल्या घरापर्यंत पोहोचविण्यात आहे!
‘बुलडाणा लाइव्ह’चे आवाहन आहे... यंदाची दिवाळी केवळ आपली नको, तर माणुसकीची करूया!