EXCLUSIVE "पांडे साहेब तुम्हारा चुक्याच"...! भव्य स्मारकांच्या लोकार्पण पत्रिकेवर "सर्वजातीय महापुरुष" असा उल्लेख! महापुरुषांना जातीपुरते मर्यादित का करता?

 
Buldhana

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्यात १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ स्मारकासह २१ महापुरुषांच्या १६ स्मारकांचे लोकार्पण होणार आहे. आ.संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा नगरपालिकेकडून या कार्यक्रमाची अगदी जंगी तयारी सुरू आहे,त्यामुळे कार्यक्रम अगदी भव्यदिव्य होणार आहे यात कुठलीही शंका नाही. अर्थात कार्यक्रमाच्या सूक्ष्म नियोजनावर आ.गायकवाड यांचे बारीक सारीक लक्ष आहे. आ.गायकवाड यांनी नियोजित केलेले कार्यक्रम परफेक्ट होतातच,कारण ते स्वतः चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत एक अक्षम्य चूक झालेली आहे. बुलडाणा नगरपालिकेने छापलेल्या पत्रिकेत "सर्वजातीय महापुरुषांच्या" स्मारकांचे लोकार्पण होत असताना अत्यंत आनंद होत आहे. असा उल्लेख पत्रिकेत आहे. त्यामुळे महापुरुषांना असे जातीचे लेबल लावणे चूकच असा सूर आता उमटू लागला आहे. प्रत्येक गोष्टीवर बारीक- सारीक नजर ठेवणाऱ्या आ.संजूभाऊंच्या नजरेतून पत्रिकेतील चूक सुटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे...

आ.गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलडाणा शहराच्या सौंदर्यकरणाची अनेक कामे होत आहेत. महापुरुषांच्या स्मारकांनी शहराच्या वैभवात, सौंदर्यात भर पडत आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १९ सप्टेंबरला या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. समस्त बुलडाणेकर या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या लोकार्पण कार्यक्रमाची पत्रिका बुलडाणा नगरपालिकेने छापली आहे. या आठ पानांच्या निमंत्रण पत्रिकेत बुलडाणा नगरपालिकेकडून (?) झालेली चूक ही "घोडचूक" म्हणावी लागेल. प्रत्येक महापुरुषाचा जन्म हा कुठल्या तरी विशिष्ट जातीत झालेला असला तरी महापुरुषांनी केलेले कार्य हे संपूर्ण मानवजातीसाठी आहे. त्यामुळे महापुरुषांचा उल्लेख "सर्वजातीय" असा केल्याने महापुरुषांना त्या त्या जातीच्या बंधनात बांधल्याचा मॅसेज या पत्रिकेतुन जात आहे. त्यामुळे "पांडे साहेब तुम्हारा काम बहौत अच्छा... लेकिन ये पत्रिका का मॅटर चुक्याच..." अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी तरी चुका टाळाव्या....
 राजकीय नेत्यांकडून जात हा विषय वेळोवेळी चर्चेला जातो, त्याला राजकीय करणे असतात. मात्र नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे हे प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून तरी महापुरुषांसाठी "सर्वजातीय" असा उल्लेख अपेक्षित नाही.
"प्रोटोकॉल" ही चुकला....
दरम्यान या कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख उपस्थितीत आमदारांच्या नावाचा क्रमदेखील चुकला आहे. विधान परिषद हे विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे.शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे विधान परिषद सदस्यांची नावे आधी लिहिणे अपेक्षित असते. मुख्याधिकारी गणेश पांडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन अधिकारी झालेले आहेत. मात्र तरीदेखील पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे, शिक्षक आमदार किरण सरनाईक,आमदार वसंत खंडेलवाल यांची नावे पत्रिकेत शेवटी लिहिलेली आहेत...