EXCLUSIVE धक्कादायक..! जिल्ह्यातील १०३ गावात दूषित पाणी.... पिण्यायोग्य नाहीच....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील बारा ते तेरा गावांमध्ये केसगळतीचे प्रकरण समोर आलेले असतानाच आता जिल्हा वासियांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. जिल्ह्यातील १०३ गावात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. डिसेंबर महिन्यात जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि भूजल सर्वेक्षण विभागातून जिल्ह्यातील विविध गावातील २१०२ पाण्याचे नमुने गोळ्या करण्यात आले होते. त्याच्या तपासणीअंती धक्कादायक अहवाल समोर आला आहे..
  शेगाव तालुक्यातील बारा ते तेरा गावात दूषित पाण्यामुळेच केस गळती होत असल्याचा संशय आहे. अर्थात अद्याप केसगळतीच्या मुळ कारणाच्या निष्कर्षाप्रत आरोग्य यंत्रणा पोहोचल्या नसल्या तरी या गावांतील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे जिल्हा प्रशासनाने या आधीच जाहीर केले आहे. दरम्यान आता जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि भूजल सर्वेक्षण विभागाकडून जिल्ह्यातील गावांमध्ये डिसेंबर महिन्यात केलेल्या तपासणीचा अहवाल समोर आला आहे. जिल्ह्यातील एकूण २ हजार १०३ पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत जिल्ह्यातील १०३ गावातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे. संबंधित ग्रामपंचायतींना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत..