EXCLUSIVE राहुल बोंद्रे शिंदे गटात येणार होते; एकनाथ शिंदेंची भेटही झाली होती! कम्युनिकेशन गॅपमुळे निर्णय बदलला; संजय गायकवाड यांचा गौप्यस्फोट
संजय गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, राहुल बोंद्रे यांच्यासोबत शिवसेनेत येण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, त्याच काळात हातावरील उपचारासाठी आपण सुमारे १५ दिवस कर्नाटकात गेलो होतो. त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या कामात तब्बल २० दिवस गेले. या काळात बोंद्रे यांच्यासोबत मोठा कम्युनिकेशन गॅप निर्माण झाला. त्यातूनच राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, चिखली विधानसभा मतदारसंघाचे सलग दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेले राहुल बोंद्रे उद्या, २२ सप्टेंबर रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाकडे संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे चिखलीच्या विद्यमान भाजपा आमदार श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे यांच्यातील राजकीय संघर्ष जिल्ह्याच्या राजकारणात सर्वश्रुत आहे. अशा पार्श्वभूमीवर बोंद्रे भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर चिखलीच्या राजकारणात नेमकी कोणती समीकरणे बदलणार, पक्षांतर्गत राजकीय गणितावर त्याचा काय परिणाम होणार आणि बोंद्रे यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे उद्याच्या प्रवेश सोहळ्याकडे चिखलीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.