EXCLUSIVE दारू महागली .. दर वाढले.. वाढू द्या...!!बुलढाण्यात १३० जणांनी काढले आजीवन दारू पिण्याचे लायसन ...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "श्याम का वक्त हो और शराब ना हो ....वक्त इतना भी खराब ना हो" .... या शायरीच्या ओळी मद्यपींच्या भावना मांडतात. अलीकडे विविध योजनांमुळे शासनाच्या तिजोरीवर वाढलेला भार कमी करण्यासाठी का होईना .. सरकारने दारू महाग केली. तसा निर्णय देखील घेतला. पण तळीरामानां त्याचं काय सोयर सुतक! जानेवारीपासून आत्तापर्यंत म्हणजे सहाच महिन्यात १३० जणांनी आजीवन दारू पिण्याचे लायसन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बुलढाणा जिल्ह्यात काढले आहे. तर ११५ जणांनी वार्षिक स्वरूपामध्ये दारू बाळगणे आणि पिण्यासाठी परवाना काढला आहे.

 तळीरामांच्या खिशाला कात्री लावत महाराष्ट्रात दारू महाग करण्यात आली. भारतीय बनावटीचे विदेशी मध्य तसेच विदेशी मद्याच्या प्रीमियम ब्रँडच्या दरात काही टक्क्यांनी वाढ करण्यात आली. तर दारू विक्रीसाठी असलेल्या लायसन्स मध्येही दरवाढ करण्यात आली. दारूतून "नशा" येत असली तरीही या मागचा "शुद्ध हेतू "हा महसूल वाढ करण्याचाच आहे. राज्यात दरवर्षी १४ हजार कोटी रुपये यातून वार्षिक महसूल मिळू शकतो. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत जून या सहा महिन्यात १३० जणांनी आजीवन स्वरूपामध्ये दारू पिणे आणि बाळगण्या संदर्भात लायसन काढले आहे.११५ जणांनी वार्षिक फी भरून परवाना मिळवला. 
 आजीवनसाठी अकराशे रुपये तर वार्षिक साठी शंभर रुपये मोजावे लागतात. यातून राज्य उत्पादन शुल्काच्या माध्यमातून राज्य सरकारला महसूल मिळतो. हा परवाना असला तर दारू पिणे किंवा खरेदी करणे अथवा सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यासाठी कायदेशीर सवलत मिळते. हा परवाना मिळवायचा म्हटल्यास तुमचे वय २१ वर्षाच्या वर असावे लागते. दारू पिण्याची लायसन असो वा नसो पिणाऱ्यांची संख्या मात्र लाखोंमध्ये आहे आणि या दारू विक्रीतूनच सरकारला महसूल देखील मिळतो. त्यामुळे दरवाढ झाली असो किंवा आणखी होणार असो त्याचा दारू पिणाऱ्यांना काय फरक पडणार ?..नाही का!