EXCLUSIVE "कर्जमाफी होणारच नाही अस अजिबात नाही; सरकारला वाटेल तेव्हा निश्चितच....!"

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यावर पालकमंत्री मकरंद पाटील यांचे बुलडाण्यात महत्त्वाचे विधान! म्हणाले, पैशाच सोंग.....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील काल,७ एप्रिल पासून तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी कर्जमाफीवर महत्वाचे विधान केले..सध्या कर्जमाफी शक्य नसून शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते, यावर पालकमंत्री मकरंद पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, अजित दादांच्या वक्तव्याचा काही जण चुकीचा अर्थ लावत आहेत. कर्जमाफी सध्या करता येणार नाही, मात्र कर्जमाफी होणारच नाही असं अजिबात नाही असं मकरंद पाटील म्हणाले. लाडक्या बहिणींसह विविध योजनांवर राज्य सरकार मोठा खर्च करत आहे, त्यामुळे सरकारला वाटेल तेव्हा निश्चितच कर्जमाफी होईल असे मकरंद पाटील यांनी सांगितले.
आठवडाभरापूर्वी बारामतीत झालेल्या एका शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले होते. राज्याची तशी आर्थिक परिस्थिती नसल्याचे अजित पवार म्हणाले होते. यावर विरोधक महायुती सरकारवर टीका करत आहेत..दरम्यान याच मुद्द्यावरून आज पत्रकारांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांना विचारणा केली. "कर्जमाफी होणारच नाही असं अजिबात नाही, अजितदादांच्या वक्तव्याचा अनेकांनी चुकीचा अर्थ घेतला, लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांवर राज्य सरकार खर्च करत आहे, त्यामुळे सरकारला वाटेल तेव्हा निश्चितच कर्जमाफी होणार आहे" अस मकरंद पाटील म्हणाले..
शेतीला शाश्वत पाणीपुरवठा करण्यावर भर.
  शेतकरी आत्महत्या संदर्भात राज्य सरकार अतिशय संवेदनशील आहे. कालपर्यंत २ हजार सातशे कोटी रुपये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत देण्यात आलेली आहे. शेतकरी आत्महत्या आणि आत्महत्येची कारणे यावर राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीला शाश्वत पाणी देण्यासाठी विविध प्रकल्प सरकारने हाती घेतल्याचे पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले. यावेळी पत्रकारांनी लोणार सरोवराच्या विकासावर देखील पालकमंत्री पाटील यांना प्रश्न विचारला, यावर ते म्हणाले की, बुलढाणा जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. मात्र पैशाच सोंग करता येत नाही.. लोणार सरोवर, राजमाता जिजाऊ यांचा जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथे विकासासाठी अतिरिक्त प्रस्तावाला मंजूर करून कशा पद्धतीने ही ऐतिहासिक स्थळे जतन केले जातील आणि इतिहास जिवंत ठेवला जाईल याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले..