EXCLUSIVE खुशखबर! ११ हजारांची ऑफर; जिल्हा परिषदेचे सीईओ सोमवारी सकाळी १० वाजता, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता दाखवा... अन् मिळवा ११ हजार! सोमवारी यायला उशीर; शुक्रवारी "जमापूंजी" घेऊन जायची घाई

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा परिषदेत सध्या एक धक्कादायक चर्चा चांगलीच रंगली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात हे सोमवारी सकाळी कार्यालयीन वेळेत आणि शुक्रवारी सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेत कार्यालयात दिसतच नाहीत..अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात जोर धरत आहे. या चर्चेने आता इतके टोक गाठले आहे की, "बुलडाणा लाइव्ह" च्या एका जागरूक वाचकाने थेट "सीईओ खरात यांना सोमवारी सकाळी १० वाजता आणि  शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या दालनात दाखवा आणि ११ हजार रुपये मिळवा," अशी जाहीर ऑफरच जाहीर केली आहे.

ग्रामीण जनतेसाठी जिल्हा परिषद म्हणजे एक प्रकारचे मिनी मंत्रालय. पंचायत राज व्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या जिल्हा परिषदेत गावखेड्यातून नागरिक विविध शासकीय कामांसाठी  येत असतात. मात्र, अनेकदा संबंधित अधिकारी जागेवर नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. सध्या जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय यंत्रणेवर प्रभावी नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे अनेक अधिकारी मनमानी कारभार करत असल्याची तक्रार सातत्याने समोर येत आहे. या सर्वात सर्वाधिक चर्चा होत आहे ती मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या उपस्थितीची. कार्यालयीन वेळ सुरू झाल्यानंतरही सोमवारी सकाळच्या सत्रात ते कार्यालयात नसतात, तर शुक्रवारी कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच ते निघून जात असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सुरू आहे. "सोमवारी यायला उशीर आणि शुक्रवारी "जमापूंजी घेऊन जायची घाई," अशी उपरोधिक प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या वर्तुळात ऐकायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा लाइव्हच्या एका वाचकाने अनोखी ऑफर जाहीर केली आहे. सोमवारी सकाळी १० वाजता आणि शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात हे त्यांच्या जिल्हा परिषदेतील दालनात उपस्थित असल्याचे प्रत्यक्ष दाखवून देणाऱ्या व्यक्तीस तब्बल ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे या ऑफरमध्ये म्हटले आहे. 

जिल्हा परिषदेचे सीईओ नियोजित वेळेत जिल्हा परिषदेत उपस्थित असल्यास बुलडाणा लाइव्ह  च्या 8766847625 किंवा 9172072321 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. आमच्या प्रतिनिधींनी खात्री केल्यानंतर जाहीर केलेल्या ११ हजारांच्या ऑफरची रक्कम देण्यात येईल.

सातत्याने वादात..

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेचे सीईओ शुक्रवारी दुपारीच अहिल्यानगरला निघून जातात. सोमवारी सकाळी अहिल्यानगरहुन त्यांच्या खाजगी वाहनाने छत्रपती संभाजीनगरला येतात. छत्रपती संभाजीनगरला बुलडाणा जिल्हा परिषदेचे शासकीय वाहन बोलावून घेतात, आणि तिथून सोमवारच्या संध्याकाळपर्यंत बुलडाणा जिल्हा परिषदेत पोहचतात. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी खरात हजर नसल्याने अनेक नागरिकांसह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळे निर्माण होतात.. बुलडाणा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासूनच गुलाबराव खरात सातत्याने वादात राहिले आहेत. शिस्तीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांवर करत असलेल्या कारवायांचा हेतू भलताच होता, दस्तरखुद केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी देखील खरातांच्या हेतूवर शंका घेतली होती. मागील वर्षी प्रति पीएचसी एक विशिष्ट रक्कम मेडिकल ऑफिसरांना मागण्यात आल्याचीही चर्चा होती. सध्या जिल्हा परिषदेत गुलाबराव खरातांच्या वेगवेगळ्या किस्स्यांची जोरदार चर्चा सुरू असते..त्यात "ल्याव्हऱ्या अन् तितर"चा किस्साही जिल्हा परिषदेत ऐकायला मिळतो..त्याविषयी "बुलडाणा लाइव्ह" वर वाचा आज दुपारी...