Exclusive बोटांचे ठसे फेल झाले तरी कर्जमुक्तीचा लाभ मिळणार! आधार प्रमाणीकरणात ३ प्रयत्नांनंतर ‘हा’ पर्याय निवडा; जाणून घ्या पुढची संपूर्ण प्रक्रिया...

 
बुलडाणा (जिमाका : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वयस्करपणा किंवा अन्य कारणांमुळे बोटांचे ठसे नोंदविता न आल्याने आधार प्रमाणीकरणात अडथळा निर्माण होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत बोटांचे ठसे तीन वेळा घेण्याचा प्रयत्न करूनही आधार प्रमाणीकरण यशस्वी झाले नाही, तर ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ (Unable to Authenticate) हा पर्याय निवडून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी महाआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. महाआयटीमार्फत संगणकीय संस्करण करून ९६.९६ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत २३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

तीन वेळा प्रयत्न करा; तरीही ठसा न आल्यास ‘Unable to Authenticate’

आधार प्रमाणीकरण करताना एका बोटाचा ठसा नोंदविला जात नसल्यास शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. तीनही प्रयत्नांनंतरही प्रमाणीकरण होत नसल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ हा पर्याय निवडता येणार आहे. त्यानंतर संबंधित आपले सरकार सेवा केंद्र चालकाने स्वतःच्या बोटांच्या ठशांद्वारे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.

पुढे काय होणार?

‘प्रमाणीकरण शक्य नाही’ हा पर्याय निवडल्यानंतर संबंधित प्रकरण तक्रारीच्या स्वरूपात तालुकास्तरीय समितीकडे (TLC) पोर्टलद्वारे पाठविण्यात येईल. यानंतर संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा आदी ओळख निश्चित करणारी आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे आवश्यक आहे.

तालुकास्तरीय समितीमार्फत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित लाभार्थ्याची ओळख निश्चित केली जाईल. आधार क्रमांक योग्य असल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्यानंतर तक्रार मान्य करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम खात्यात

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वयस्करपणा किंवा अन्य कारणांमुळे बोटांचे ठसे नोंदविता न येणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नियमानुसार कर्जमुक्तीच्या लाभाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.त्यामुळे बोटांचे ठसे जुळत नसल्यामुळे कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही, अशी भीती पात्र शेतकऱ्यांनी बाळगू नये. अशा शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधून प्रथम नियमानुसार आधार प्रमाणीकरणाचे प्रयत्न करावेत. तीन प्रयत्नांनंतरही प्रमाणीकरण न झाल्यास ‘Unable to Authenticate’ हा पर्याय वापरून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.