EXCLUSIVE माणुसकीची दिवाळी! ‘बुलडाणा लाइव्ह’च्या हाकेला संवेदनशील बुलडाणेकरांची साथ; ७५० ते ८०० कुटुंबांपर्यंत पोहोचेल एवढी मदत जमा!

 गरजूंच्या घरापर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्यास सुरुवात;!  मदत स्वीकारतानाचे फोटो नाहीत, कारण ते याचक नव्हेत, आपलेच बांधव आहेत...!

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दिवाळीचा सण प्रत्येकाच्या घरात सारखाच उजाडत नाही... कुणाच्या घरात फराळाची लगबग असते, तर कुणाच्या घरात उद्याच्या भाकरीची चिंता! कुठे नवीन कपड्यांची खरेदी सुरू असते, तर कुठे परिस्थितीशी झुंजणाऱ्या आईला आपल्या लेकरांच्या अपेक्षा कशा पूर्ण कराव्यात, हा प्रश्न पडलेला असतो. अशा कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाचा एक छोटासा क्षण निर्माण व्हावा, या भावनेतून ‘बुलडाणा लाइव्ह’ने सुरू केलेल्या ‘माणुसकीची दिवाळी’ उपक्रमाला संवेदनशील बुलडाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कुणी आपल्या कमाईतील काही हिस्सा दिला, कुणी आर्थिक मदत केली, तर कुणी थेट साहित्याच्या स्वरूपात आपले योगदान पोहोचवले. या सर्वांच्या सहकार्यातून आतापर्यंत साधारण ७५० ते ८०० गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचता येईल एवढी मदत उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, मदतीतून दिवाळी किट तयार करण्याचे कामही सुरू झाले असून आज सायंकाळपासून बुलडाणा आणि चिखली शहरासह चिखली तालुक्यातील गरजू कुटुंबांपर्यंत ही किट पोहोचविण्यास सुरुवात झाली आहे. 

कुणी पैसे दिले, कुणी साहित्य... प्रत्येकाच्या योगदानातून उभी राहतेय माणुसकी!

‘बुलडाणा लाइव्ह’ने दिवाळी अंकाच्या जाहिरात निधीतून तसेच लोकसहभागातून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, दुर्गम आदिवासी वस्त्यांतील बांधव, पालावर संसार करणारी कुटुंबे आणि अत्यंत गरजू घटकांपर्यंत दिवाळीचे साहित्य पोहोचविण्याचा संकल्प केला आहे.या आवाहनानंतर जिल्ह्यातील संवेदनशील नागरिकांनी आपापल्या परीने मदतीचे हात पुढे केले. कुणी एका कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली, तर कुणी आपल्या क्षमतेनुसार अधिक कुटुंबांसाठी योगदान दिले. काहींनी आर्थिक मदतीऐवजी थेट आवश्यक साहित्य ‘बुलडाणा लाइव्ह’ टीमपर्यंत पोहोचवले.या प्रत्येक योगदानामागे एकच भावना आहे... आपल्या आनंदात समाजातील गरजू बांधवांनाही सहभागी करून घ्यायचे!खरे तर या उपक्रमाचे श्रेय ‘बुलडाणा लाइव्ह’चे नाहीच. ते आहे त्या प्रत्येक संवेदनशील माणसाचे, ज्याने दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवून आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला.

साडी-चोळी, किराणा अन् थोडीशी मिठाई; मोठेपणाचा दावा नाही, आपुलकीचा प्रयत्न!

उपलब्ध मदतीतून गरजू कुटुंबांसाठी दिवाळी किट तयार करण्याचे काम सुरू आहे. या किटमध्ये साडी-चोळी, दिवाळीसाठी आवश्यक किराणा साहित्य आणि थोडीशी मिठाई देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.अर्थात, या किटमधून एखाद्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण होणार नाहीत. त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होणार नाहीत किंवा त्यांच्या आयुष्यातील दुःखही संपणार नाही.याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे.

पण दिवाळीच्या दिवसांत त्यांच्या घरापर्यंत आपुलकीचा एक हात पोहोचावा, आपल्या कठीण परिस्थितीत समाज आपल्याला विसरलेला नाही, ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचावी, एवढाच आमचा प्रयत्न आहे. ही मदत तोकडी असेल, पण त्यामागची भावना प्रामाणिक आहे. आम्ही कुणावर उपकार करीत नाही, तर समाजाचा एक घटक म्हणून आपले कर्तव्य निभावण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहोत.

मदत स्वीकारतानाचे फोटो कशाला? ते याचक नाहीत, आपलेच बांधव आहेत!

या उपक्रमात ‘बुलडाणा लाइव्ह’ने एक गोष्ट जाणीवपूर्वक जपण्याचा निर्णय घेतला आहे. ती म्हणजे मदत स्वीकारणाऱ्या कुटुंबांचा स्वाभिमान! गरजू कुटुंबांना साहित्य देताना त्यांच्या हातात किट देऊन फोटो काढणे, ते फोटो प्रसिद्ध करणे किंवा त्यांच्या परिस्थितीचे प्रदर्शन करणे, हा आपला उद्देश नाही.
कारण मदत स्वीकारणारा माणूस हा याचक नसतो. परिस्थितीच्या कठीण वळणावर उभा असलेला तो आपलाच बांधव असतो.


आज त्याच्यावर संकट आले आहे. उद्या अशी वेळ कुणावरही येऊ शकते. त्यामुळे त्याला मदत करताना त्याचा स्वाभिमान जपणे, हे मदतीइतकेच महत्त्वाचे आहे. कुणाच्या डोळ्यांतील अश्रूंचे छायाचित्र काढण्यापेक्षा ते अश्रू पुसण्यासाठी हात पुढे करणे  अधिक महत्त्वाचे वाटते. मदत दिल्याचा पुरावा म्हणून कुणाची गरिबी जगासमोर मांडण्याची आवश्यकता नाही.

आज सायंकाळपासून प्रत्यक्ष वितरणाला सुरुवात!

लोकसहभागातून उपलब्ध झालेल्या मदतीचे किटमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू झाले आहे. आज सायंकाळपासून बुलडाणा शहर, चिखली शहर आणि चिखली तालुक्यातील गरजू कुटुंबांपर्यंत किट पोहोचविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 
आतापर्यंत जमा झालेल्या मदतीतून साधारण ७५० ते ८०० कुटुंबांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.  दुष्काळाने होरपळलेल्या शेतकरी कुटुंबांपासून दुर्गम आदिवासी वस्त्यांतील बांधवांपर्यंत आणि पालावर संसार करणाऱ्या कुटुंबांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार आहे.

‘बुलडाणा लाइव्ह’ केवळ निमित्त; खरे मानकरी मदतीचे हात!

आजवर ‘बुलडाणा लाइव्ह’ने सामाजिक कार्यासाठी जेव्हा जेव्हा आवाहन केले, तेव्हा तेव्हा जिल्हावासीयांनी विश्वास दाखवला. यंदाही त्याच विश्वासाची प्रचिती येत आहे. आमच्याकडे मदत पोहोचविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार! आपण दिलेले योगदान हे केवळ आर्थिक मदत किंवा साहित्य नाही, तर समाजातील दुसऱ्या माणसाच्या वेदनेशी जोडलेली संवेदनशीलता आहे. या उपक्रमात ‘बुलडाणा लाइव्ह’ची भूमिका केवळ एक दुवा म्हणून आहे. मदत करणारे हात आपले आहेत, गरजूंपर्यंत पोहोचणारी आपुलकी आपली आहे आणि या कार्याचे खरे मानकरीही आपणच आहात.

हे मोठे समाजकार्य नाही; माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे!

आम्ही फार मोठे काही करीत आहोत, असा आमचा मुळीच दावा नाही. हजारो गरजू कुटुंबांच्या अडचणींच्या तुलनेत हा प्रयत्न अत्यंत छोटा आहे. आम्ही देत असलेले साहित्यही मर्यादित आहे. पण आपल्याकडे जे आहे, त्यातील थोडासा वाटा दुसऱ्यासाठी बाजूला ठेवणे, हीच खरी माणुसकी आहे, असे आम्हाला वाटते. आपल्या घरात दिवाळीचा दिवा पेटताना एखाद्या गरजू कुटुंबाच्या घरातही आनंदाचा छोटासा क्षण निर्माण व्हावा, एवढीच इच्छा आहे.
आम्हाला कुणाचे आभार नकोत, कुणाचे उपकारकर्ते व्हायचे नाही. केवळ समाजाने आपल्याला जे दिले, त्यातील थोडेसे समाजाला परत द्यायचे आहे.