Exclusive चिखली तालुक्यातून आणखी एक आमदार? मराठवाडा पदवीधरच्या रिंगणात बुलढाण्याचा सुपुत्र! शेळगाव आटोळचे एम. के. देशमुख मैदानात; भाजपची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी!

 शिक्षणाधिकारी म्हणून मराठवाड्यात दीर्घकाळ सेवा; वर्षभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश; पदवीधर नोंदणीपासूनच निवडणुकीची तयारी....

 

 चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मराठवाडा विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या शेळगाव आटोळ येथील सुपुत्र एम. के. देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मराठवाड्यात शिक्षणाधिकारी म्हणून दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतर २०२४ मध्ये ते शासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर राजकीय क्षेत्रात सक्रिय होत त्यांनी वर्षभरापूर्वी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश केला. आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी राजकीय मैदानात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

एम. के. देशमुख हे मूळचे चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील आहेत. मराठवाड्यात शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी शिक्षण विभागातील प्रशासकीय अनुभव मिळवला. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि पदवीधरांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. २०२४ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी राजकीय वाटचालीला सुरुवात केली. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक आहेत.शेळगाव आटोळ येथे त्यांचे नेहमी येणे-जाणे असते. त्यामुळे मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्राशी असलेला संपर्क आणि बुलढाणा जिल्ह्याशी असलेली नाळ, अशी दोन्ही बाजू देशमुख यांच्या राजकीय वाटचालीत महत्त्वाची आहे.

भाजपमध्ये प्रवेशापूर्वीच पदवीधर निवडणुकीची तयारी

देशमुख यांनी वर्षभरापूर्वी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश केला. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी त्यांनी त्याआधीपासूनच सुरू केली होती. पदवीधर मतदार नोंदणी, मतदारांशी संपर्क आणि निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक संघटनात्मक तयारी यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते.त्यामुळे या निवडणुकीसाठी देशमुख यांनी आधीपासूनच नियोजन केले होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि पदवीधरांशी असलेला संपर्क या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

महायुतीची जागा राष्ट्रवादीला; भाजपच्या देशमुखांची बंडखोरी

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळाली. माजी आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी केलेल्या एम. के. देशमुख यांच्यासमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला.

अखेर देशमुख यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीतील अंतर्गत संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. महायुतीच्या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार असताना भाजपच्या देशमुखांनी स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल केल्याने निवडणुकीत पक्षीय समीकरणांना आव्हान निर्माण झाले आहे.

मराठवाड्यातील अनुभव, पदवीधरांशी संपर्क; देशमुखांची कसोटी

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांशी थेट संपर्काला महत्त्व असते. देशमुख यांनी शिक्षणाधिकारी म्हणून मराठवाड्यात काम केले असल्याने त्यांना या क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव आहे. पदवीधर मतदार नोंदणीपासून सुरू केलेली तयारी आणि शिक्षण क्षेत्रातील संपर्काच्या बळावर त्यांनी निवडणुकीत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.दुसरीकडे, महायुतीकडून सतीश चव्हाण आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिलीप घुगे मैदानात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील लढत अनेक उमेदवारांमध्ये विभागली गेली आहे.

चिखली तालुक्याला विधानपरिषदेचे प्रतिनिधित्व मिळणार?

शेळगाव आटोळचे एम. के. देशमुख यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दाखल केल्याने बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. शासकीय सेवेत शिक्षणाधिकारी म्हणून काम, सेवानिवृत्तीनंतर राजकीय प्रवेश आणि पदवीधर मतदारसंघासाठी आधीपासून सुरू केलेली तयारी, या पार्श्वभूमीवर देशमुख निवडणुकीत उतरले आहेत.
आता पदवीधर मतदारांचा कौल मिळवण्यासाठी त्यांना मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संपर्क वाढवावा लागणार आहे. भाजपमधून उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांनी घेतलेला स्वतंत्र उमेदवारीचा निर्णय आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचा संपर्क, या दोन बाबी त्यांच्या निवडणूक वाटचालीतील महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळचा हा सुपुत्र विधानपरिषदेपर्यंत पोहोचतो का, याचे उत्तर निवडणुकीचा निकालच देईल.