

EXCLUSIVE मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर आ. गायकवाडांचे एक पाऊल मागे! म्हणाले, जाहीर......
Apr 27, 2025, 09:50 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत आ. गायकवाड यांनी पोलिसांबद्दल विधान केले होते. "पोलिसांइतके अकार्यक्षम डिपार्टमेंट महाराष्ट्रात भारतात सोडून जगात कुठेही नाही. शासनाने एक कठोर कायदा केला की त्यांचा एक हप्ता वाढतो, त्यांनी ५० लाखांची कारवाई केली की ते ५० हजार दाखवतात" अशा आशयाचे विधान आ.गायकवाड यांनी केले होते. या विधाननंतर मित्रपक्ष भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांना टार्गेट करण्यासाठी तर हे विधान नाही ना अशीही शंका भाजपकडून उपस्थित केल्या जात होती. काल, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाबद्दल नाराजी व्यक्त करीत एकनाथ शिंदे यांना मी त्याबद्दल सांगणार असून त्यांनी त्यांना कडक समज द्यावी, नाहीतर ॲक्शन घेऊ असा इशारा फडणवीस यांनी दिला होता. फडणवीस यांच्या या इशाऱ्यानंतर आ.गायकवाड यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.
Advt👆
"मी केलेले विधान मला आलेल्या अनुभवावरून होते. महाराष्ट्र पोलिसांचे धैर्य खचवणे, त्यांचे साहस, धाडस, पराक्रम याचा अपमान करण्यासाठी माझं विधान नव्हतं. जे अनुभव माझ्यासोबत झाले होते तेच अनुभव मी त्या ठिकाणी मांडले होते. माझ्या त्या विधानामुळे महाराष्ट्र पोलिसांची व महाराष्ट्र सरकारची जर नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो" असे आ.गायकवाड आज माध्यमांशी बोलताना म्हणाले. देवेंद्रजींनी नाराजी व्यक्त केल्याचे मला कळाले, एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोनही आला होता असेही आ.गायकवाड यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. मात्र मी जे वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे, माझ्या परिवारासोबत तसं घडलेलं आहे याचा पुनरुच्चार आमदार गायकवाड यांनी केला. तुम्ही तुमच्या विधानावर ठाम आहात का? असे आ. गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले की, त्या दिवशी चुकून महाराष्ट्र पोलीस असा उल्लेख झाला. तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाहीतर स्थानिकचा आहे, आणि स्थानिक च्या मुद्द्यावर मी ठाम आहे असे आ.गायकवाड म्हणाले.