Exclusive प्रशासकीय टोलवाटोलवी! "हा" म्हणाला,त्यांना विचारा.."तो" म्हणाला, ह्यांना विचारा!मेहकरचा मेळावा शासनाचा की शिवसेनेचा?

 सीईओ म्हणतात, ‘कार्यक्रम शासनाचा’; पुढील प्रश्नांवर म्हणाले, ‘जिल्हाधिकाऱ्यांशी बोला!’ विभागप्रमुखांची मात्र खासगीत वेगळीच माहिती; लेखी आदेशाशिवाय अधिकारी व्यासपीठावर?

 
 बुलढाणा (कृष्णा सपकाळ: बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त काल, २७ नोव्हेंबर रोजी मेहकर येथे पार पडलेल्या दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळाव्यावरून प्रशासकीय तटस्थतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा कार्यक्रम नेमका महाराष्ट्र शासनाचा होता की शिवसेनेचा, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. यासंदर्भात ‘बुलढाणा लाइव्ह’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा कार्यक्रम शासनाचा असल्याचे सांगितले. मात्र, कार्यक्रमाच्या पक्षीय स्वरूपासंदर्भात पुढील प्रश्न विचारताच ‘यासंदर्भात तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोला’, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या काही विभागप्रमुखांनी खासगीत बोलताना हा कार्यक्रम शिवसेनेचा असल्याचे सांगितल्याने या प्रकरणातील संभ्रम आणखी वाढला आहे.

मेहकर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या मुख्य व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण उपस्थित होते. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषदेचे जवळपास सर्वच विभागप्रमुख व्यासपीठाच्या डाव्या बाजूला मांडण्यात आलेल्या खुर्च्यांवर उपस्थित होते. मुख्य व्यासपीठावरील बहुतांश राजकीय पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात शिवसेनेचे रुमाल होते. खुद्द केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनीही शिवसेनेचा रुमाल परिधान केला होता. कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि पक्षाशी संबंधित नेत्यांची भाषणे झाली. व्यासपीठाच्या मागील बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार शशिकांत खेडेकर, ऋषी जाधव यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे होती. मात्र, हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचा असल्याचा उल्लेख बॅनरवर कुठेही दिसत नव्हता. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही शिवसेनेचे पक्षचिन्ह असून, निमंत्रक म्हणून शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख होता.

जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने उपमुख्यमंत्र्यांचे हेलिपॅडवर स्वागत करणे, त्यांच्या दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचाराचे पालन करणे, शासकीय कामकाजासंदर्भात उपस्थित राहणे, या बाबी समजण्यासारख्या आहेत. मात्र, पक्षीय स्वरूप दिसणाऱ्या कार्यक्रमाच्या मुख्य व्यासपीठावर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे कितपत योग्य आहे? कार्यक्रम शासनाचा असेल तर त्यावर शिवसेनेचा पक्षीय ठसा कशासाठी? आणि कार्यक्रम शिवसेनेचा असेल तर जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा तेथे कोणत्या शासकीय कर्तव्याच्या अनुषंगाने उपस्थित होती, या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.

सीईओंना विचारला थेट सवाल; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याचा दिला सल्ला!

यासंदर्भात ‘बुलढाणा लाइव्ह’ने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. मेहकर येथील कार्यक्रम शासनाचा होता की शिवसेनेचा, असा थेट सवाल त्यांना करण्यात आला. सुरुवातीला या प्रश्नावर स्पष्ट उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी कार्यक्रम शासनाचा असल्याचे सांगितले. मात्र, कार्यक्रम शासनाचा होता तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे, गळ्यातील पक्षीय रुमाल आणि व्यासपीठावरील पक्षीय बॅनर याबाबत काय सांगाल, असा प्रश्न विचारला असता त्यांनी ‘या संदर्भात तुम्ही जिल्हाधिकारी महोदयांशी बोला’, असे सांगत पुढील प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले.

लेखी आदेश नव्हता? ऑनलाइन बैठकीतून दिल्या उपस्थित राहण्याच्या सूचना?

या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांनी ‘बुलढाणा लाइव्ह’शी खासगीत बोलताना हा कार्यक्रम शिवसेनेचा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात कोणताही लेखी आदेश प्राप्त झाला नसल्याचेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ऑनलाइन बैठक घेतली होती. या बैठकीतून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. 

जिल्हाधिकारी साहेब, कार्यक्रम नेमका कोणाचा होता?

शासकीय योजनांचे लाभ वितरण करण्यास अथवा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. प्रश्न आहे तो प्रशासकीय तटस्थतेचा! शासकीय आणि पक्षीय कार्यक्रमांमधील सीमारेषा स्पष्ट ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मेहकरचा कार्यक्रम शासनाचा असेल तर त्यासंदर्भातील अधिकृत आदेश, आयोजक विभाग आणि कार्यक्रमाच्या खर्चाचा तपशील प्रशासनाने जाहीर करावा. कार्यक्रम शिवसेनेचा असेल तर जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विभागप्रमुखांच्या उपस्थितीचे कारण स्पष्ट करावे. केवळ व्यासपीठावरील उपस्थितीवरून नियमभंग झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नसला, तरी उपस्थित झालेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.आता जिल्हाधिकारी डॉ.देवरे  या संपूर्ण प्रकरणावर काय स्पष्टीकरण देतात, याकडे लक्ष लागले आहे.