EXCLUSIVE बुलढाणा जिल्ह्यात "हेवी रेन" चे अब तक ५६ ! सरासरी ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस, महसूल मंडळांमध्ये झाली नोंद ..
Jun 26, 2025, 19:45 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लग्नसराईत धामधूम करणारा पाऊस पेरणीच्या तोंडावर मात्र गायब झाल्यासारखा होता. जेमतेम ३० टक्के झालेल्या पेरण्या आणि उर्वरित ७० टक्के क्षेत्रावर कधी पेरणी करायची या विवंचनेत शेतकरी होते. मात्र काल सायंकाळपासून पावसाने एन्ट्री घेत चौफेर फटकेबाजी केली आहे. यामुळे काही भागात बळीराजा सुखावला आहे तर दुसरीकडे जमिनी खरडून गेल्याने पावसाने डोळ्यात पाणी देखील आणल्याचे वास्तव आहे.. तर दुसरीकडे यंदा सरासरीच्या ६५ मीमी पेक्षा अधिक पावसाची नोंद म्हणजेच हेवी रेन बाबत महसूल मंडळांनी ५६ चा आकडा पार केला आहे. यात "उन्हाळ्यातील पावसाची" सुद्धा नोंद आहे हे विशेष !
मृग काहीसा कोरडा गेला. मात्र आषाढ मासारंभ शेतकऱ्यांसाठी पाऊस सरी घेऊन आला. काल सायंकाळ पासून सुरू झालेल्या पावसाने मेहकर भागात पावसाने पूर परिस्थिती ओढवली आहे. आहे. त्या भागात पूर परिस्थितीचे अनेक व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. आज सकाळपासून पावसाने संततधार सुरू ठेवली. वाहतूक व दळणवळणावर देखील याचा परिणाम दिसून आला. जिल्ह्यात सर्व दूर या पावसाची हजेरी दिसून आली. महत्वाचे म्हणजे यंदा उन्हाळ्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान मांडले होते. सरासरी ६५ मिमी च्या वर पाऊस पडल्यास "हेवी रेन" अर्थात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती गणल्या जाते.बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या महसूल मंडळांमध्ये वेगवेगळ्या दिवशी अतिवृषची नोंद घेण्यात आली. यंदा तब्बल ५६ महसूल मंडळात हेवी रेनची नोंद झाली आहे. यात बुलढाणा, चिखली, मेहकर ,लोणार ,देऊळगाव राजा,सिंदखेड राजा, खामगाव ,शेगाव व जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या महसूल मंडळांचा समावेश आहे. जून महिन्यात सुध्दा तब्बल ३१ महसूल मंडळात "हेवी रेन" बाबत नोंद घेण्यात आली आहे.
यावर्षी आतापर्यंत नोंद झालेली महसूल मंडळ ..
जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव, जामोद पिंपळगाव काळे, वडशिंगी ,आसलगाव , चिखली तालुक्यातील चिखली, अमडापूर, उंद्री, एकलारा कोलारा, मेरा, हातनी ,धोडप , पेठ, चांदई , बुलढाणा तालुक्यातील बुलढाणा ,रायपुर, पाडळी, साखळी, देऊळघाट यासोबतच देऊळगाव राजा शहर व ग्रामीण, तुळजापूर, मेहुणा, अंढेरा तर मेहकर तालुक्यातील मेहकर ,जानेफळ, हिवरा, शेलगाव, डोणगाव, देऊळगाव, वरवंड ,लोणी ,अंजनी, नायगाव कल्याना, सिंदखेड राजा तालुक्यात सिंदखेड, किनगाव, मलकापूर, दुसरबीड, सोनोशी ,शेंदुर्जन , लोणार मध्ये बीबी, सुलतानपूर ,टिटवी, हिरडव, अंजनी , तर खामगाव तालुक्यात लाखनवाडा, हिवरखेड, अटाळी, पळशी ,आडगाव ,वझर तसेच शेगाव आणि मनसगाव या महसूल मंडळांचा यात समावेश आहे.