महिला-बाल कल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर! जिल्हास्तरीय आढावा बैठकीत विविध विभागांना समन्वयाच्या सूचना...

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत महिला व बालकांच्या संरक्षण, आरोग्य, शिक्षण व पुनर्वसनासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बाल संरक्षण विषयक उपक्रम तसेच विभागीय समन्वय अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी महिला व बालकांच्या हितासाठी विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी विभागांमध्ये अधिक समन्वय राखण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
बैठकीदरम्यान बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, महिला सक्षमीकरण तसेच शिक्षण व आरोग्यविषयक उपक्रम अधिक परिणामकारकपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी संयुक्तपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर बैठकीचे सचिव म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल दिघोळे यांनी कामकाज पाहिले. बैठकीच्या शेवटी उपस्थित अधिकारी, मान्यवर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.