बुलढाण्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू! ११ नगरपरिषदांसाठी आचारसंहिता लागू; ४.७६ लाख मतदार सज्ज...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच बुलढाणा जिल्ह्यात राजकीय तापमान चढले आहे. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली असून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

 ४.७६ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
या निवडणुकांमध्ये एकूण ४,७६,८५५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २,४२,१०८ पुरुष, २,३४,७२६ महिला आणि २१ इतर मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ७ ‘ब’ वर्ग आणि ४ ‘क’ वर्ग नगरपरिषदांमधील १४१ प्रभागांमधून एकूण २८६ नगरसेवक निवडले जाणार आहेत.
त्यापैकी १४५ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
 उमेदवारांसाठी ऑनलाइन नामनिर्देशनाची सुविधा
राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना नामनिर्देशनपत्र ऑनलाइन सादर करणे अनिवार्य केले आहे.
यासाठी आयोगाने https://mahasecelec.in
 हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागेल.
छाननी, अपील आणि चिन्हवाटप यासंदर्भातील तपशील आयोगाने जाहीर केला असून, नगराध्यक्ष पदासाठी खर्च मर्यादा ७.५ ते १५ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
 मतदारांसाठी नवी सुविधा
मतदारांना आपले नाव आणि मतदान केंद्र तपासता यावे, यासाठी आयोगाने https://mahasecvoterlist.in
 हे संकेतस्थळ आणि मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले आहे.
मतदान केंद्रांवर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि बालसंगोपन करणाऱ्या महिलांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, सावली आणि शौचालयाच्या सुविधा उपलब्ध असतील.
तसेच, महिला मतदारांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी ‘पिंक मतदान केंद्रे’ उभारली जाणार आहेत.
 निर्भय मतदानासाठी प्रशासनाचे आवाहन
आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
हेल्पलाइन क्रमांक १९५० आणि १०७७ याद्वारे नागरिक तक्रारी नोंदवू शकतात.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले की,“लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करावे. प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे.”
बुलढाण्यातील या निवडणुकांकडे राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार सर्वांचे लक्ष वेधले गेले असून, येत्या काही दिवसांत प्रचाराचा जोरदार माहोल रंगणार आहे.