पैनगंगा नदीवर पूल नसल्याने शेतीसाठी शेतकऱ्यांसह मजुरांचा जीवघेणा प्रवास; पैनगंगा नदीवर पूल बांधण्याची किन्हाेळा येथील शेतकऱ्यांची मागणी..!
Updated: Sep 17, 2025, 15:00 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पैनगंगा नदीवर पूल बांधण्यात आला नसल्याने किन्हाेळा येथील शेतकरी आणि शेतमजुरांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे. ब्रम्हपूरी शिवारात असलेली शेती करण्यासाठी नदीला पूर असल्यास जाताच येत नाही. त्यामुळे,याचा परिणाम शेतीच्या उत्पन्नावर झाला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देउन पैनगंगा नदीवर पुल बांधण्याची मागणी किन्हाेळा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
किन्होळा गावाला लागूनच पैनगंगा नदी वाहते. दोन तिन वर्षांपासुन नदीचे खोलीकरण झाल्याने गावालगतच नदिपात्र सात-आठ फुट खोल झाले आहे.
नदिवर काही ठिकानी बंधारे बांधल्याने नदीपात्रात चार-पाच फूट पाणी कायम वाहत राहते. त्यामुळे या वाहत्या पाण्यामधून शेतकरी व शेत मजुरांना आपला जीव धोक्यात घालून शेती करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
विविध अडचणी असल्याने शेतीच्या मशागतीची काम वेळेवर होत नाही. त्याचे परिणाम शेती उत्पन्नावर होऊन शेतकरी आर्थीक व मानसीक अडचणीत सापडला आहे. यामुळे ब्रम्हपुरी शिवारातील शेती करने अवघड होऊन बसले आहे. बरेच शेतकरी आपली शेती विक्रीच्या तयारीत आहेत आहेत.
परंतु नेहमीच असलेली पूर परिस्थिती यामुळे या भागातील शेती खरेदी करण्यास ग्राहक सुद्धा मिळत नाही.
अगोदरच संकटात असलेला बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने प्राधान्याने स्मशानभूमीलगत पैनगंगा नदिवर पूल वजा बंधारा बांधून दिल्यास किन्होळा गावकऱ्यांची पीण्याच्या पाण्याची, शेती सिंचनाची आणि रस्त्याची समस्या कायमची मिटणार आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत असलेला हा महत्वाचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. ब्रम्हपुरी शिवारातील शेतात जाण्यासाठी नदिवरील बंधारे फोडून शेतकरी पाण्यातून जाण्यासाठी जी धडपड करतात, ती कायमची बंद करण्यासाठी लोकप्रतिनिधिंनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.