पुन्हा अवकाळीचा तडाखा; १३ गावांतील ८८४ हेक्टर पिके उद्ध्वस्त, १५९४ शेतकरी संकटात; काढणीच्या तोंडावर गारपीट; लोणार तालुक्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान...
Mar 21, 2026, 10:11 IST
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यात रब्बी हंगामातील पिके जोमात आली असून अनेक ठिकाणी काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. बुधवारी (दि. १९) झालेल्या अवकाळी पावसासह काही भागात गारपीट व वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील १३ गावांमधील सुमारे ८८४.८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून याचा फटका १,५९४ शेतकऱ्यांना बसला आहे.
तालुक्यात गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, भुईमूग, टोमॅटो तसेच टरबूज यांसारखी पिके चांगली वाढलेली होती. विशेषतः गहू व हरभरा ही पिके काढणीला आली असताना काही ठिकाणी काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली.
या पावसाचा प्रभाव वेगवेगळ्या भागांत वेगवेगळा दिसून आला. काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर काही भागांत गारपीटही झाली. यासोबतच वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या मोहरालाही फटका बसल्याचे दिसून आले.
दरम्यान, सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पावसामुळे टरबूज व कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढून ठेवलेला कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. अनेक ठिकाणी टरबूज पिकाचेही नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.