जिल्ह्यात अवकाळीचे तांडव! सावखेड नागरे येथे वीज पडून गोठा जळाला; ३ जनावरे दगावली, शेती उपयोगी साहित्य जळून खाक... अल्पभूधारक शेतकरी कुटुंबावर संकट...
Updated: Mar 31, 2026, 09:29 IST
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात काल अवकाळी पावसाचे मोठे तांडव पहायला मिळाले. दुपारपर्यंत कडक ऊन आणि त्यानंतर अचानक ढग दाटून येत अवकाळी पावसाची बरसात झाली..अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड नागरे येथे गोठ्यावर वीज पडून तीन जनावरे दगावल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार काल,३० मार्चच्या रात्री ८ वाजता सावखेड नागरे येथिल अल्पभूधारक शेतकरी अशोक दराडे यांच्या मालकीच्या गोठ्यावर वीज कोसळली. यामुळे गोठ्याला आग लागली, या आगीत गोठ्यातील ३ गायींचा होरपळून मृत्यू झाला. याशिवाय गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य, पेट्रोल पंप, स्प्रिंकलर पाईप आदी जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.आज सकाळी तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. या घटनेने शेतकरी दराडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून लेकराप्रमाणे जपलेली जनावरे दगावली आहेत.. दराडे कुटुंबाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.