आधीच दुष्काळाने कंबरडे मोडले, आता शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी पेटवण्याचे सत्र सुरूच! मेहकर तालुक्यात दोन एकरांतील सोयाबीनची सुडी आगीच्या भक्ष्यस्थानी; ३० पाइपही जळून खाक!
बुलडाणा जिल्ह्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. लागवडीसाठी केलेला खर्चही निघेल की नाही, अशी परिस्थिती असताना आता शेतातील सोयाबीनच्या गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे ठाकले आहे.
मेहकर तालुक्यातील विश्वी येथील शंकर देवराव त्रिकाल यांनी आपल्या दोन एकर शेतातील सोयाबीन काढून त्याची सुडी रचून ठेवली होती. मात्र या सुडीला आग लावण्यात आल्याने त्यांच्या कष्टाची अक्षरशः राखरांगोळी झाली. सोयाबीनसोबतच शेतातील ३० पाइपही जळून खाक झाले. आधीच दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या त्रिकाल यांच्यासमोर आता मोठे संकट उभे राहिले आहे. या घटनेमुळे अंदाजे एक लाख साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले असून, शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टावर कोणाचा डोळा?
जिल्ह्यात सोयाबीनच्या गंजी पेटवून देण्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने या प्रकारांबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. वर्षभर शेतात राबराब राबून, कर्ज काढून, निसर्गाशी दोन हात करून शेतकरी पीक उभे करतो. मात्र हातातोंडाशी आलेला घास अशा पद्धतीने हिरावला जात असेल, तर शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, शेतातील सोयाबीनच्या सुड्या पेटवण्यामागे नेमके कोण आहे? वैयक्तिक वैमनस्यातून असे प्रकार घडत आहेत की जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न होत आहे? याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. विश्वी येथील घटनेत आग लावणाऱ्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दुष्काळातून वाचलेले पीकही आगीत; शासनाने मदत करावी!
दुष्काळामुळे यंदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आधीच मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत शेतातील सोयाबीन आणि शेतीचे साहित्य आगीत नष्ट होणे म्हणजे शेतकऱ्याच्या आर्थिक संकटात आणखी भर पडण्यासारखे आहे. शंकर त्रिकाल यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. महसूल व कृषी विभागाने घटनेची दखल घेऊन नुकसानीचा पंचनामा करावा आणि नियमानुसार मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.दरम्यान, जिल्ह्यात अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनीही गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीची राख करणाऱ्या घटनांचा तपास होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आधीच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र होण्याची भीती आहे.