डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक उत्सव समिती अध्यक्षपदी पत्रकार निलेश राऊत
Feb 27, 2025, 10:45 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेव) :डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक उत्सव समिती बुलढाणा २०२५ ची कार्यकारीणी गठीत करण्यासाठी काल बुधवारी वारी २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक विश्राम भवन प्रांगणात बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी पत्रकार निलेश राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. २०२४च्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल कासारे यांनी वैचारीकरित्या त्यांना पदभार दिला. यावेळी शहर व सुंदरखेड परिसरातील आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तथा सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे संचलन २०२४चे सचिव विनोद इंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन अमोल खरे यांनी केले.
यावर्षी १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १४४वा जयंती उत्सव सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याच्या पुर्वतयारीसाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी दिलीपभाऊ जाधव, आशिषबाबा खरात, कुणाल पैठणकर, बाळाभाऊ राऊत, वैशालीताई ठाकरे, पत्रकार दिपक मोरे व सुनिल मोरे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे व मोठ्या संख्येने बौध्द उपासक व उपासिका उपस्थित होते.
२०२५ हे वर्ष सार्वजनिक जयंती उत्सव समिती साठी २१व्या शतकातील रौप्य महोत्सवी वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार राजेंद्र काळे, महात्मा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार लक्ष्मीकांत बगाडे तर आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार निलेश राऊत यांची निवड झाली आहे.