

कायदा हातात घेऊ नका; सण उत्सव बंधुभावाने साजरे करा! एसपी विश्व पानसरे यांचे आवाहन;बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक ...
Mar 28, 2025, 18:46 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय संविधान आपल्याला बंधुभाव शिकवते. त्यामुळे या एकतेच्या मूल्यांना तडा जाईल असे कृत्य आपल्या हातून होऊ देऊ नका. आगामी काळातील सण उत्सव एकोप्याने साजरे करा. जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकू नका, कुणीतरी टाकलेल्या पोस्ट डोळे बंद करून फॉरवर्ड करू नका असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केले. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आज, २८ मार्चला सायंकाळी शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीला संबोधित करताना, एसपी विश्व पानसरे बोलत होते. यावेळी मंचावर अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे उपस्थित होते.
आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी, भीम जयंती, हनुमान जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विविध सामाजिक मंडळाचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सामाजिक सद्भाव बिघडेल असे वक्तव्य कुणी करू नये, आपण सर्व जबाबदार व्यक्ती आहात, त्यामुळे समाजाला एका सूत्रात बांधण्याची जबाबदारी आपली आहे असे आवाहनही एसपी विश्व पानसरे यांनी केले.
नुकसान आपलेच....
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलीस लहान-मोठा असा भेदभाव करीत नाहीत. त्यामुळे कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न केला तरी पोलीस कुणालाच सोडत नाहीत. त्यामुळे प्रक्षोभक घोषणाबाजी, आक्षेपार्ह पोस्ट, जातीय तेढ निर्माण होतील असे संदेश असल्या भानगडीत पडू नये. जातीय तेढ निर्माण झाल्यास नुकसान आपलेच म्हणजे समाजाचे होते..त्यामुळे सामाजिक सद्भाव कायम ठेवत बंधूभावाने, एक दिलाने उत्सव साजरे करावे असे एसपी विश्व पानसरे म्हणाले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मुख्याधिकारी पांडे यांच्यासह शांतता समितीच्या सदस्यांनी आपले म्हणणे मांडले. आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग राजपूत यांनी केले.