“आवाज नको वाजवू डीजेवाल्या, पोलिसांच्या रडारवर आलाय…” मिरवणुकीत कर्कश डीजे वाजवला अन् मालकावर गुन्हा; गणेशोत्सवातील डीजेवाल्यांना मलकापूर पोलिसांचा इशारा..

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगामी मिरवणुकांमध्ये कर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्या चालक-मालकांनी आता सावध होण्याची गरज आहे. निवासी क्षेत्रात निर्धारित ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी डीजे मालकाविरुद्ध थेट गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनासह पुढील मिरवणुकांमध्ये ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे मालकांवरही कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, भुसावळ येथील आशिष रविंद्र अडकमोल यांच्या ताब्यातील एमएच-४३-एडी-०२०५ क्रमांकाच्या वाहनावरील डीजेचा दोन वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये वापर करण्यात आला. या मिरवणुकांदरम्यान निवासी भागात निर्धारित ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक कर्कश आवाजात ध्वनिक्षेपण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, संबंधित डीजे मालकाविरुद्ध यापूर्वीही मलकापूर शहर पोलिसांनी पोलीस अधीक्षक, बुलडाणा यांच्याकडे अहवाल सादर केला होता.

यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार १८ सप्टेंबर रोजी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गणेशोत्सवातील आगामी मिरवणुका आणि विसर्जन सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर या कारवाईमुळे कर्कश डीजे वाजविणाऱ्या इतर डीजे चालक-मालकांनाही पोलिसांचा स्पष्ट इशारा मिळाला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते.