

"पुरस्कार नको पाणी द्या..." स्व कैलास नागरेंचे फोटो विधिमंडळात झळकले; विरोधी पक्षांची जोरदार घोषणाबाजी; अंबादास दानवे म्हणाले, पाण्यासाठी गेला जीव, सरकारला आली नाही कीव...
Mar 17, 2025, 18:13 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवणी आरमाळ येथील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी १४ मार्च रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. कैलास नागरे यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी आंदोलनात्मक लढा उभारला होता. मात्र शासनाने दखल न घेतल्याने कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. कैलास नागरे यांनी दिलेल्या ४ पानांच्या सुसाईड नोट वरून पाण्यासाठीच कैलास नागरे यांचा जीव केल्याचे समोर आले होते. दरम्यान कैलास नागरे यांच्या आत्महत्येच्या मुद्देवरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. आज,१७ मार्चला विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. कैलास नागरे यांच्या आत्महत्येवरून अंबादास दानवे यांनी सरकारला सवाल केले आहेत..
पुरस्कार नको पाणी द्या, पाण्यासाठी गेला जीव , सरकारला आली नाही कीव अशा घोषणांनी विधिमंडळ परिसर दणाणून गेला होता. सरकार निर्लज्ज आहे. इथे पाण्यासाठी शेतकरी मरतो हे महाराष्ट्राला शोभणारे नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात बोलताना दिली..